तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
nanabhau-embwadwar : महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व वनमंत्री नानाभाऊ एंबडवार यांचे शनिवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता कोंघारा येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. नानाभाऊ यांचा जन्म राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे 19 नोव्हेंबर 1936 रोजी झाला. यवतमाळात शिक्षणासाठी आले असता विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकमध्ये प्रवेश घेतला.
1977 ला यवतमाळ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून नानाभाऊंचा फक्त 12 हजार मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांनी दिग्रस मतदारसंघात मोठी आघाडी घेतल्याने पुढे त्यांनी दिग्रस विधानसभा लढविली असता ते विजयी होऊन आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आणि त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. 1978, 1980 आणि 1985 असे तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते.
त्यांच्यामागे पत्नी शकुंतला, दीपक, रवींद्र आणि आनंद ही मुले आणि मोठा चाहता वर्ग आहे. कै. नानाभाऊ एंबडवार यांच्यावर रविवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.