नागपूर,
winter-session : विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात घेतले जावे, हा करार आहे. पण विदर्भातील जनतेच्या एवढ्या समस्या असताना केवळ सात दिवस अधिवेशन चालावे हा येथील लोकांवर अन्याय आहे. हा अन्याय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. म्हणूनच शासनाने यावर रामबाण तोडगा काढत वेगळे विदर्भ राज्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती काटोल जिल्हा कृती समितीचे संयोजक प्रदीप उबाळे पाटील यांनी केली आहे.
भाजपाने नेहमीच छोट्या राज्यांचा पुरस्कार केला. कारण छोट्या राज्यांमुळे विकास झपाट्याने होत असतो. हीच भूमिका स्वीकारून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी झारखंड, छत्तीसगड आदी राज्यांची निर्मिती केली होती. तशीच भाजपाची छोट्या जिल्ह्यांनाही प्राधान्य देण्याची भूमिका आहे. आम्ही गेल्या 25 वर्षांपासून काटोल जिल्ह्याची मागणी करीत आहोत. काटोल आणि नरखेड तालुक्यांचा हवा तसा विकासच झालेला नाही. कारण हे दोन्ही तालुके नागपूरपासून खूप दूर आहेत. समजा नरखेड तालुक्याला सोबत मिळून काटोल जिल्ह्याची निर्मिती झाल्यास सर्व प्रकारच्या शासकीय सोयी तिथेच उपलब्ध होतील. वारंवार लोकांना नागपुरात शासकीय कामकाजासाठी चकरा मारण्याची गरज पडणार नाही. पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी अधीक्षक कार्यालय, सत्र न्यायालय, जिल्हा रुग्णालय काटोल भागात होईल. परिणामी लोकांना चांगल्या सुविधा मिळतील. काटोल जिल्हा व्हावा अशा सर्व प्रकारच्या गोष्टी येथे सहजतेने होऊ शकतात. तेव्हा महाराष्ट्र शासनाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत वेगळे विदर्भ राज्य तथा काटोल जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी विनंती प्रदीप उबाळे पाटील यांनी केली आहे.