अशगबात,
Shahbaz forcibly entered the meeting तुर्कमेनिस्तानमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास मंचात सहभागी होण्यासाठी गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात अपमानाला सामोरे जावे लागल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या परिषदेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट मिळावी म्हणून शाहबाज शरीफ यांना तब्बल ४० मिनिटे वाट पाहावी लागली. इतका वेळ उलटूनही भेट न झाल्याने अखेर ते पुतिन आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यात सुरू असलेल्या बैठकीत जबरदस्तीने प्रवेश करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, त्यावरून पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुरुवातीला समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये एका मोठ्या दालनात पाकिस्तान आणि रशियाचे झेंडे लावलेले दिसतात. त्या खोलीत शाहबाज शरीफ बसलेले असून पुतिन यांच्यासाठी राखीव असलेली खुर्ची रिकामी आहे. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर शाहबाज शरीफ अस्वस्थ होत आपल्या सहकाऱ्यांशी काहीतरी बोलताना दिसतात. यानंतर अचानक ते खुर्चीवरून उठतात, सुरक्षारक्षकांना बाजूला सारत शेजारच्या एका हॉलमध्ये प्रवेश करतात. काही क्षणांसाठी दरवाजा बंद राहतो, मात्र थोड्याच वेळात सुरक्षारक्षक शाहबाज शरीफ यांना त्या हॉलमधून बाहेर काढताना दिसतात. त्याच वेळी समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये त्या हॉलमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांच्यात बैठक सुरू असल्याचे स्पष्ट होते.
तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे सुरू असलेल्या या परिषदेदरम्यान पुतिन आणि एर्दोगान यांची बंद दाराआड चर्चा सुरू होती. त्याच वेळी आपल्या द्विपक्षीय भेटीस उशीर होत असल्याने संतप्त झालेले शाहबाज शरीफ त्या बैठकीत प्रवेश केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या प्रकारामुळे पुतिन यांनी हस्तक्षेप करून त्यांना तिथून बाहेर काढल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ आरटी इंडियाने सोशल मीडियावर शेअर केला होता, मात्र नंतर तो हटवण्यात आला. घटनांचे चुकीचे सादरीकरण झाल्याची शक्यता असल्याचे कारण देण्यात आले. दुसरीकडे, पाकिस्तानी माध्यमांनी हा दावा फेटाळत सांगितले की शाहबाज शरीफ यांनी पुतिन आणि एर्दोगान यांच्याशी चर्चा केली असून द्विपक्षीय तसेच प्रादेशिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद झाला आहे. याच दौऱ्यात त्यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचीही भेट घेतल्याचे पाकिस्तानी बाजूने स्पष्ट करण्यात आले आहे.