गडचिरोली,
solar irrigation मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील शाश्वत विकासाच्या प्रयत्नांना अधिक बळ देत, कारगिल इंडियाने गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात पर्यावरणास अनुकूल सिंचन प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आहे. बीएआयएफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहुड्स अँड डेव्हलपमेंट (बीएआयएफ) यांच्या भागीदारीत, या उपक्रमाने डिझेल पंपांची जागा सौर-शक्तीवर चालणार्या लिफ्ट सिंचन प्रणालीने घेतली आहे.
हा बदल शेतीसाठी लागणारा खर्च कमी करणारा आणि दिवसा सिंचनासाठी विश्वसनीय पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करणारा ठरला आहे. या प्रकल्पामुळे 22 गावांमधील 150 शेतकरी कुटुंबांना फायदा झाला असून, त्यासाठी 31 सौर-शक्तीवर चालणारे सिंचन युनिट्स बसवण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या स्थायित्वासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये शेतकर्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच स्थानिक दोन तरुणांना सिंचन युनिट्सच्या देखभालीसाठी प्रशिक्षित करण्यात आले, जेणेकरून भविष्यातही हा प्रकल्प सुरळीत चालू राहील. याव्यतिरिक्त, सामूहिक विपणनाचे समर्थन करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना देखील सुरू करण्यात आली आहे. कारगिलने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 29 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
या प्रकल्पामुळे सिंचन खर्च कमी झाला असून पिकांची सुरक्षितता सुधारली आहे, ज्यामुळे शेतीत सुधारणा झाली आहे. या सौर सिंचनामुळे शेतकर्यांमध्ये सरकारी योजना आणि सौर सिंचनाबद्दल जागरूकता वाढली आहे, तसेच ग्रीनहाउस वायू उत्सर्जन कमी करण्यातही योगदान मिळाले आहे.