दोनदा तलाख...मौलवी आणि दिरासोबत हलला...

    दिनांक :13-Dec-2025
Total Views |
अमरोहा,
Triple Talaq twice उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून प्रेमविवाह, तिहेरी तलाक आणि कथित हलालाशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, या घटनेने सामाजिक आणि कायदेशीर वर्तुळात खळबळ उडवली आहे. अलिगडची रहिवासी आणि अमरोहाची सून असलेल्या एका महिलेने आपल्या पती अझहर नवाज याच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. एका मिस्ड कॉलपासून सुरू झालेली ही प्रेमकहाणी पुढे तिच्या आयुष्यासाठी दुःस्वप्न ठरल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. २०१५ साली अझहर नवाज आणि पीडिता यांची ओळख मिस्ड कॉलमधून झाली. ओळख वाढत गेली, प्रेम झाले आणि कुटुंबीयांच्या संमतीने दोघांचा निकाह पार पडला. लग्नानंतर त्यांना मुलेही झाली. सुरुवातीचे काही वर्षे सुरळीत गेल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. याच काळात अझहरने पत्नीला पहिल्यांदा तिहेरी तलाक दिल्याचा आरोप आहे. मात्र, कुटुंबीयांच्या हस्तक्षेपानंतर बुलंदशहरमधील एका मौलानाच्या माध्यमातून हलाला करण्यात आल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर अझहरने पुन्हा तिच्याशी लग्न केले आणि या काळात एका मुलीचा जन्म झाला.
 

halala 
महिलेच्या आरोपानुसार, काही काळाने पुन्हा वाद झाल्यानंतर अझहरने दुसऱ्यांदा तिहेरी तलाक दिला. याच दरम्यान त्याने दुसरे लग्नही केले. नंतर पुन्हा पहिल्या पत्नीला परत आणण्यासाठी तिला राजी करण्यात आले आणि या वेळी कथितरित्या तिचा हलाला तिच्या दिराशी करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. त्यानंतर अझहरने पुन्हा तिच्याशी निकाह केला आणि दोन्ही पत्नींना एकत्र ठेवू लागल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या संपूर्ण काळात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचाही आरोप पीडित महिलेने केला आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे अखेर तिने धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारे अमरोहा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अझहर नवाज याला अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे. नांगली पोलीस ठाण्याचे प्रभारी विकास सेहरावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अझहर नवाज व्यतिरिक्त आणखी तीन ते चार जणांचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे तिहेरी तलाक आणि हलाला यासारख्या प्रथांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.