सिंदेवाही,
tiger-attack : शेतात रोवलेल्या तुरी पाहण्याकरिता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील बीट पवनपार 2 मधील कक्ष क्रमांक 1413 मध्ये शनिवार, दि. 13 डिसेंबर रोजी घडली. अरुणा उर्फ छाया अरुण राऊत (49) असे मृतक महिलेचे नाव आहे.
अरुण किसन राऊत (57) हे आपल्या पत्नी अरुणा उर्फ छाया यांच्यासह गुंजेवाही येथे राहत होते. त्यांची मुलगी नलिना चंद्रपूर येथे, तर मुलगा विज्ञान नागपूर येथील एका कंपनीत कामाला असल्याने घरी पती-पत्नी हे दोघेच होते.
अरुण राऊत हे गावातच लोहा खदान येथील टिप्परवर चालक म्हणून काम करतात, तर पत्नी अरुणा उर्फ छाया या गृहिणी होत्या. शनिवारच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी अरुण आपल्या कामावर गेले होते. दुपारचे जेवण करण्याकरिता अरुण घरी परतले, तेव्हा त्यांची पत्नी शेतावर गेली असल्याचे त्यांना कळले. जेवण झाल्यानंतर अरुण पुन्हा आपल्या कामावर परतले. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान ते घरी परतले असता, पत्नी घरी आली नव्हती. त्यामुळे अरुण यांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली, परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही.
पत्नीचा शोध घेण्यासाठी अरुण यांनी गावातील 30 ते 40 नागरिकांना सोबत घेऊन शेताकडे धाव घेतली. शेतात पोहोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण शेतातील परिसर तसेच लगतचा जंगल परिसर शोधण्यास सुरुवात केली. रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास एका झुडपात, नाल्यालगत अरुणा उर्फ छाया या मृतावस्थेत आढळून आल्या. मृतक अरुणा उर्फ छाया यांच्या गळ्याला, दोन्ही पायांना आणि पाठीला गंभीर जखमा होत्या. तसेच त्यांचे दोन्ही हात पूर्णतः तुटलेले होते. यावरून वाघाने हल्ला केल्याची खात्री झाली.
या घटनेची माहिती सिंदेवाही वनविभाग आणि पोलिसांना देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला. रविवार, दि. 14 डिसेंबर रोजी महिलेच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. वन विभागाने मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून 25 हजार रुपये पती अरुण यांच्या हाती सुपूर्द केली. यावेळी सिंदेवाही वन परिक्षेत्र (प्रादेशिक) च्या वन परिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार, गुंजेवाहीचे क्षेत्रसहायक प्रणय मानकर यांच्यासह वन कर्मचारी उपस्थित होते.