बीड,
Mangesh Sasane attack मागील काही दिवसांपासून विविध घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. ओबीसी आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे आंदोलक मंगेश ससाणे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या हल्ल्यात ससाणे यांच्या वाहनाच्या मागील व बाजूच्या काचा फुटल्या असून सुदैवाने त्यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नाही.
मंगेश ससाणे हे दोन महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पुण्याहून बीड जिल्ह्यात आले होते. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी या प्रकरणासंदर्भात पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर माजलगावहून धारूरकडे जात असताना विसावा हॉटेलच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर अचानक दगडफेक केली.
या घटनेनंतर ससाणे Mangesh Sasane attack यांनी तात्काळ धारूर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या तक्रारीवरून धारूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर ससाणे यांनी स्वतः फेसबुक लाईव्ह करत रात्री उशिरा संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यांनी हा हल्ला भीती निर्माण करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला.ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मंगेश ससाणे आक्रमक भूमिका घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी या मागणीसाठी उपोषणही केले होते. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ स्वतः त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी उपस्थित राहिले होते. ससाणे हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही बाजू मांडली आहे.दरम्यान, बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, ससाणे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.