बिजवाई सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच

-दर सहा हजारांखाली -शेतकर्‍यांमध्ये निराशा

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
वाशीम,
bijwai-soybean : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बिजवाई सोयाबीनचे दर साडे आठ हजार रुपये प्रती क्विंटलच्यावर पोहोचले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून या सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत आहे. शनिवारी वाशिम बाजार समितीत या सोयाबीनला केवळ ५ हजार ८०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचेच दर मिळाले. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.
 
 
kl
 
वाशीम कृउबासअंतर्गत मागील दोन महिन्यांपासून बिजवाई दर्जाच्या सोयाबीनची आवक होत आहे. या बाजार समितीत बिजवाई दर्जाच्या उन्नती ११३५ या सोयाबीन वाणाचे दर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ८ हजार ५०० रुपये प्रती क्विंटलच्या वर पोहोचले होते. बाजार समितीत बिजवाई सोयाबीना मिळणार्‍या विक्रमी दराची माहिती राज्यातील अनेक जिल्ह्यात पसरली होती. त्यामुळे हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावी, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील शेतकरी वाशीमच्या बाजार समितीत सोयाबीनच्या विक्रीसाठी धाव घेत होते. त्यामुळे या बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक होऊ लागली होती. मागील काही दिवसांपासून मात्र, बिजवाई सोयाबीनच्या दरात सतत घसरण होत असून, या दर्जाच्या सोयाबीनचे दर आता थेट ६ हजार रुपये प्रती क्विंटलच्या खाली घसरले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे.
 
 
विक्रमी आवक
 
 
येथील बाजार समितीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची आवक ३० हजार क्विंटलवर पोहोचली होती. त्यावेळी सोयाबीनला आकर्षक दरही मिळत होते. मात्र, दरात घसरण सुरू होताच शेतकर्‍यांनी सोयाबीनची विक्री थांबवली. आता रब्बी हंगामाच्या खर्चासाठी शेतकरी सोयाबीन विकत आहेत. त्यामुळे पुन्हा आवक वाढत असून, शनिवारी या बाजार समितीत १० हजार २०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.