अनिल फेकरीकर
नागपूर,
ranjitsingh-mohite-patil : महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. पण आज ही प्रगती केवळ शहरांपुरती मर्यादित झाली आहे. परिणामी खेड्यात राहणारे शेती सोडून शहराकडे पलायन करीत आहेत. यामुळे शहराची लोकसंख्या अक्षरश: फुगत आहे. ज्या प्रमाणे अंगावर आलेली सूज वेदनादायी असते, अगदी त्याच धर्तीवर शहरातील वाढती लोकसंख्या घातक ठरू शकते अशी भूमिका विधान परिषदेचे आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांनी मांडली.

शहरातील वाढती लोकसंख्या ही समस्या असली तरी यावर उपाय आहेत. त्यानुसार खेड्यांनाच समृद्ध केले तर नक्कीच शहराकडे येणारा लोंढा थांबेल अन् प्रत्येकाला पुरेशा प्रमाणात नागरी सुविधा मिळतील. शहरात पार्किंगचा मुद्दा गंभीर आहे. केवळ कार नव्हे तर दुचाकी खरेदी करणाèयांजवळ ती ठेवायला जागा आहे किंवा नाही याची खातरजमा प्रथम व्हायला हवी. जागा असेल तरच वाहन खरेदीची मुभा द्यावी. अन्यथा गुन्हेगारी वाढेल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. शिवाय प्रकल्प कुठलाही असो, तो घोषित झाल्यानंतर एका विशिष्ट कालावधीत पूर्णत्वास जायलाच हवा. अन्यथा त्या प्रकल्पाची किंमत वाढत जाते. मागेल त्याला शेततळे आणि जलयुक्त शिवार या दोन्ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी केल्या. याच कारणाने जलस्तर वाढल्याचेही ते म्हणाले.
ग्रामीण भागातील घरकूल योजना चांगली आहे. पण त्याची पूर्तता त्वरित व्हायला हवी. दरम्यान, सौर ऊर्जेवरील आधारीत मोटार पंप 5 ते 10 एचपी क्षमतेचा मिळावा. ज्याला जेवढी आवश्यकता त्यानुसार ते सौरपंप मिळाल्यास नक्कीच सिंचन वाढेल. सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, बीड जिल्ह्यांसाठी कृष्णा भीमा मराठवाडा प्रकल्प उत्तम ठरणार आहे. तो तातडीने पूर्णत्वास जावा. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचा माणूस असल्याचेही गौरवोद्गार आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांनी काढले. समृद्धी महामार्ग प्रगतीचा राजमार्ग आहे. दरम्यान, नागपूरचा होत असलेला विकास पाहता आम्हाला खूप आनंद झाला. महामेट्रो तर भविष्यात नागपूरचे भूषण राहील असेही भाकित त्यांनी वर्तवित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाबाबत असलेल्या दूरदृष्टीचा गुणगौरव केला. शेवटी शेतकरी समृद्ध झालाच पाहिजे. जेव्हा शेतकरी समाधानी राहील त्या दिवशी स्थलांतर थांबेल आणि समतोल साधला जाईल. म्हणूनच शेतीसह पूरक उद्योगांना युद्धपातळीवर प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे.
गडकरी यांच्याकडूनच भाषण शैली शिकलो
विधान परिषदेची फार मोठी उज्ज्वल परंपरा आहे. या सभागृहात जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो, तेव्हा नितीन गडकरी विरोधी पक्षाचे नेते होते. त्यावेळी ते अभ्यासू भाषण करायचे. तीच शैली आपण आत्मसात केली अशी रोचक माहिती आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांनी दिली.