तभा वृत्तसेवा
वणी,
central-team-raid : तालुक्यातील नीलजई कोळसा खदान आणि महामाया कोल वॉशरीजमध्ये कोळशाच्या मोठ्या हेराफेरीचा संशय बळावल्याने केंद्रीय पथकाने चार ठिकाणी एकाच वेळी धाड टाकून सर्व कागदपत्रांची तपासणी केली आहे.
महामाया कोलवॉशरीज, निलजई खदान, वे-ब्रिज आणि सबएरिया ऑफिस येथे करण्यात आलेल्या धाडीत महत्त्वाची कागदपत्रे, वाहतूक नोंदी, गेट पास, नमुना रेकॉर्ड ही सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. अनेक कर्मचाèयांची कसून झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती आहे.
उच्च दर्जाचा कोळसा खुल्या बाजारात वळवला जात असल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे कोट्यवधींच्या कोळसा हेराफेरीचा मोठा संशय कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा मोठा घोटाळा उजेडात येण्याची चिन्हे वर्तविण्यात येत आहे. वेब्रिजवरील कामगारांची चौकशी करीत केंद्रीय पथकाने कोळशाच्या वाहतुकीसंबंधी वजन नोंदी, ट्रक तपशील आणि वॉशरीतील स्टॉक रजिस्टर बारकाईने तपासले. प्राथमिक तपासात या नोंदींमध्ये मोठी विसंगती आढळल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईमुळे वणी तालुक्यात कोळसा व्यवसायिकात प्रचंड खळबळ उडाली असून कोळसा हेराफेरी प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.