देवळी,
deoli-campaign-election : देवळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थगितीच्या खंडानंतर पुन्हा एकदा प्रचार रणधुमाळीला धार आली आहे. २ डिसेंबरचे मतदान स्थगित झाल्यानंतर आता २० डिसेंबरच्या निवडणुकीकडे देवळी शहराचे लक्ष लागले असून राजकीय वातावरण तापले असले तरी मतदारांची भूमिका गुलदस्त्यातच आहे.
शहरात पुन्हा सभा, रॅल्या, बॅनर पोस्टर आणि दारोदार प्रचाराचा भडका उडाला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून प्रचाराचा केंद्रबिंदू एकच ठरत आहे. सभांच्या माध्यमातून परस्परांवर बोटं दाखवली जात आहेत. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठीची लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. विजय आपलाच या आत्मविश्वासाने उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केला असून कोणतीही कसर सोडलेली नाही. प्रभागनिहाय उमेदवारांनी नव्याने समीकरणे जुळवत जनतेच्या दरबारात धाव घेतली असून मीच कसा योग्य उमेदवार हे पटवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे.
आ. राजेश बकाने व माजी खा. रामदास तडस हे मात्तबर नेते थेट रणांगणात उतरले असून देवळीत आजपर्यंत झालेला विकास व आगामी विकास योजनांचा अजेंडा मतदारांसमोर ठेवला जात आहे. संघटनात्मक ताकदीच्या जोरावर भाजपाने प्रचाराला वेग दिला आहे.
काँग्रेसकडून माजी मंत्री रणजित कांबळे हे प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवून असून आ. अभिजित वंजारी यांनी सभेतून काँग्रेस उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. स्थगितीच्या मुद्द्यावरून टिकेची झोड उचलणे काँग्रेसकडून सुरू आहे. तसेच जनशती आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार ट्रॅटरवरून प्रचार करत चौकाचौकात सभांचा धडाका लावला असून मतदारांना निवडून देण्याचे आवाहन करीत आहे. अपक्ष उमेदवारही मैदानात असून घरोघरी जाऊन मतदारांना गळ घालत असल्याने लढत रंगतदार होण्याची चिन्ह आहे. सर्वच पक्ष जोर लावत असले तरी मतदार सध्या शांत आहे.