अलर्ट! 'या' राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा

येलो सोबत रेड अलर्ट जारी

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
मुंबई,
winter alert Maharashtra गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीने जोर धरला असून गारठा सातत्याने वाढत आहे. सकाळच्या वेळी थंडगार वारे वाहत असून नागरिकांना हुडहुडी भरत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याने तेथून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम महाराष्ट्रावरही जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून मध्य महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
 

winter alert Maharashtra 
जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात तापमानात मोठी घट झाली आहे. या भागांमध्ये होत असलेल्या हिमवर्षामुळे उत्तरेकडून थंड वारे राज्यात दाखल होत असून त्यामुळे किमान तापमान झपाट्याने घसरत आहे. परिणामी, डिसेंबर महिनाभर थंडी कमी-अधिक प्रमाणात कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान एक अंकी पातळीवर पोहोचले आहे. परभणी येथे 6.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून धुळे येथे 6.1 अंश, निफाड 6.3 अंश, जळगाव 7 अंश तर नाशिक, पुणे आणि मालेगाव येथे सुमारे 9 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. विदर्भातही थंडीचा प्रभाव वाढत असून भंडारा आणि गोंदिया येथे किमान तापमान 10 अंशांच्या आसपास गेले आहे.
 
 
हवामान विभागाने winter alert Maharashtra आहिल्यानगर, परभणी, निफाड आणि धुळे या भागांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच नाशिक, आहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदूरबार, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमान आणखी घसरण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सलग सहाव्या दिवशी किमान तापमान पाच ते सहा अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. रुई येथे 5.3 अंश तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या गारठ्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांना पहाटेच्या थंडीत कांदा विक्रीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जावे लागत आहे. थंडीपासून बचावासाठी शेतकरी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत.
दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.