नागपूरला मिळणार नवे 'ऑक्सिजन हब'

* बाबुळखेड्यात साकारणार इरो टुरिझम पार्क * फेब्रुवारीत उद्घाटनाचे नियोजन • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आढावा

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
नागपूर,
chandrashekhar-bawankule : नागपूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि निसर्गप्रेमींना हक्काचे ठिकाण उपलब्ध करून देण्यासाठी सावनेर तालुक्यातील बाबुळखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात मोठा इको टुरिझम पार्क विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध झाली असून, येत्या फेब्रुवारी महिन्यात या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
 
 
 
bawankule
 
 
वन मंत्री गणेश नाईक यांच्या दालनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीला वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव, वन विभागाच्या उप वनसंरक्षक विनिता व्यास यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पासाठी आवश्यक ती महसूल विभागाची जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून फेब्रुवारी महिन्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करावे, जेणेकरून नागपूरकरांना आणि विदर्भातील पर्यटकांना लवकरच एका जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाची भेट मिळेल.
 
* प्रकल्पाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये
 
 
* महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार असून, यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
* हा प्रकल्प सावनेर तालुक्यातील कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील मौजे बेल्लोरी (खुर्द) आणि मौजे चांपा येथील सुमारे ५४.१२ हेक्टर क्षेत्रावर साकारला जाणार आहे.
* या पर्यटन स्थळाचा विकास करताना पर्यटकांच्या सोयीसुविधा आणि निसर्ग संवर्धनाचा समतोल राखला जाणार आहे.
 
•प्रकल्पामध्ये खालील बाबींचा समावेश
 
• थीम पार्क्स आणि वने : पर्यटकांच्या आकर्षणासाठी नक्षत्र वन, बेलवन, गणेश वन, पंचवटी वन, तसेच औषधी व मिश्र रोपवनांची निर्मिती केली जाईल.
• ॲडव्हेंचर आणि मनोरंजन : तरुणाईसाठी ‘झोन-१’ मध्ये ॲडव्हेंचर पार्क आणि रिक्रिएशन झोन तयार करण्यात येईल.
• लहान मुलांसाठी खास सोय : शालेय विद्यार्थ्यांसाठी निसर्ग शिक्षण केंद्र, लहान मुलांसाठी साहसी खेळणी आणि विविध थीम्सवर आधारित सुविधा असतील.
• अद्ययावत सुविधा : पर्यटकांसाठी एम्फीथियेटर, राहण्याची सोय आणि निसर्ग माहिती देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त निसर्ग निर्वाचन केंद्र उभारले जाईल.
 
पंचमुखी हनुमान मंदिरास लागूनच हा परिसर असल्याने धार्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. या परिसरातील खडकाळ जमिनीचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा वापर करून हे स्थळ विकसित केले जाणार आहे.