तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
National Lok Adalat : यवतमाळात 13 डिसेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये वकील व पक्षकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात 13 कोटी 95 लाख 88 हजार रुपयांच्या तडजोडीची 11 हजार 633 च्या वर प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर 13 जोडप्यांचा संसार सावरण्यात आला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशांवरुन शनिवारी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष शेखर मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय लोकअदालतचे शेखर मुनघाटे यांच्याहस्ते रोपट्याला पाणी देऊन उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दीपक दाभाडे, कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश सीएल देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-2 एसआर शर्मा, जिल्हा वकील संघ अध्यक्ष संजय जैन, सर्व न्यायीक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार व ईतर मंडळी उपस्थित होती.
या लोकअदालतीत प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँक व पतसंस्थेची वादपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवण्यात आली. यासाठी न्या. शेखर मुनघाटे, दीपक दाभाडे, सहकारी न्यायाधीशांनी परिश्रम घेतले. या लोकअदालतीत 2100 प्रलंबित प्रकरणे व 9533 वादपूर्व प्रकरणे असे एकूण 11633 प्रकरणे निकाली निघाली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकूण तडजोड मूल्य 13 कोटी 95 लाख 88 हजार रुपये होते. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व न्यायालयातुन 1391 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीत 13 जोडप्यांचा संसार सावरण्यात आला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समित्यांनी तसेच सर्व न्यायाधीश व कर्मचाèयांनी आयोजित राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यासाठी जिल्हाधिकारी, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, उपजिल्हाधिकारी, भू-अर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी, सहकारी बँका, संस्थाचे अधिकारी, विमा कंपन्याचे अधिकारी, पोलिस अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक, वकील, स्वंयसेवक तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अधीक्षक आरजे काझी यांचे सहकार्य मिळाले.