शेजारी युवकाचा महिलेवर प्राणघातक हल्ला

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
तळेगाव (शा. पंत), 
attack-on-a-woman : येथील जुन्या वस्ती परिसरात शेजारी राहणार्‍या युवक अभय रानोटकार (२०) याने कुसुम ठाकरे (५७) वार्ड ३ या महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अमरावती येथे रुग्णालयात अति दक्षतागृहात उपचार सुरू आहे. ही घटना आज रविवार १४ रोजी सकाळी १० वाजताचे दरम्यान घडली.
 
 
DSC_9607
 
 
प्राथमिक माहितीनुसार, शाब्दिक वादातून हा प्रकार विकोपाला गेला. संतप्त युवकाने कुसुम ठाकरे यांच्या डोयावर दगडाने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी होऊन काही वेळ जागेवरच बेशुद्ध अवस्थेत पडून होत्या. परिसरातील तरुणांनी ही बाब तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. जखमी महिलेला तातडीने येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले. हल्ल्यानंतर युवकाने घटनास्थळावरून पलायन केले होते. मात्र तळेगाव पोलिसांनी वेगाने हालचाल करत अवघ्या दोन तासांत त्याला आर्वी येथून ताब्यात घेतले.
 
 
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मंगेश भोयर, किशोर खंडार, जमादार माहोरे हे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. तर दुपारी घटनास्थळी फारेन्सिक टीम दाखल होऊन घटनास्थळाची तपासणी करण्यात आली.