शिंदेंची ‘पॉवर’ : पुढील महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता?

प्रकाश आंबेडकर यांचा दावा

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
पुणे,
Prakash Ambedkar राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपच्या भूमिकेत झालेल्या बदलावरून सत्ताधारी आघाडीत नेतृत्व बदलाची नांदी असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेत्यांचा सूर बदलला असून, महापालिका निवडणुका शिंदे गटाच्या शिवसेनेसह लढण्याचे संकेत दिले जात आहेत. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली असून, पुढील एक-दोन महिन्यांत ते पुन्हा मुख्यमंत्रीपदी दिसले, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे भाकीत आंबेडकर यांनी व्यक्त केले.
 

Prakash Ambedkar  
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक शनिवारी पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात पार पडली. या बैठकीत अ‍ॅड. आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला आता माघार घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी आपली ‘पॉवर’ आणि राजकीय किमया पुन्हा दाखवून दिली असून, त्यामुळेच भाजपचा सूर बदलल्याचे त्यांनी नमूद केले.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची नुकतीच झालेली भेट ही देखील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. शरद पवार हे चाणक्य राजकारणी आहेत, यात दुमत नाही. या भेटीतून जो संदेश द्यायचा होता, तो देण्यात आला आहे, असे सूचक विधान त्यांनी केले.
 
 
वेगळ्या विदर्भाच्या Prakash Ambedkar  मुद्द्यावर बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात ऊस आणि कापूस ही दोन प्रमुख पिके आहेत. मात्र कापसाला योग्य भाव मिळत नाही. विदर्भातील मुख्यमंत्री असूनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने वेगळ्या विदर्भाची मागणी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.विधिमंडळातील विरोधी पक्षनेते पदावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नसले तरी सत्ताधारी भाजपने राजकीय नैतिकता दाखवत विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षांपैकी मोठ्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद द्यायला हवे होते. मात्र भाजपला सर्वच पक्ष संपवायचे आहेत, त्यामुळे तसे झाले नाही, असा आरोप त्यांनी केला.महापालिका निवडणुकांच्या संदर्भात वंचितची भूमिका स्पष्ट करताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांत भाजप वगळता इतर पक्षांसोबत वंचितने युती व आघाडी केली आहे. त्याच धर्तीवर महापालिका निवडणुकाही युती किंवा आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्यात येतील. भाजप सोडून डावे-उजवे सर्व पक्ष आम्हाला चालतील. खेळ आता सुरू झाला असून, पुढे घडणाऱ्या घडामोडींनुसार वंचित आपली राजकीय भूमिका ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.