पिंपरी-चिंचवड,
Prithviraj Chavan देशाच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधान बदलेल आणि पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती विराजमान होईल, असे भाकीत त्यांनी पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या एका कार्यक्रमात व्यक्त केले. विशेष म्हणजे, या महिन्यातील हा त्यांचा दुसरा असा दावा असून त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कार्यक्रमात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडींचा संदर्भ देत हा दावा केला. अमेरिकेत एका व्यक्तीने इस्त्रायलचा गुप्तहेर म्हणून काम करत अनेक बड्या नेत्यांच्या निवासस्थानी कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केल्याचे त्यांनी सांगितले. या स्टिंग ऑपरेशनमधून अनेक दिग्गज नेत्यांचे गैरप्रकार उघड होणार असून १९ डिसेंबर रोजी त्या नेत्यांची नावे जाहीर केली जातील, असा दावाही त्यांनी केला. मात्र, ही नावे कोणाची आहेत, याची आपल्याला सध्या कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंतरराष्ट्रीय Prithviraj Chavan घडामोडींचे पडसाद भारतातही उमटतील आणि त्याचा थेट परिणाम देशाच्या नेतृत्वावर होऊ शकतो, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. “कदाचित भारताचा पंतप्रधानही बदलेल,” असे विधान त्यांनी यावेळी केले. यापूर्वी सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी लवकरच मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी दिसेल, असा दावा केला होता. मात्र, यावेळी त्यांनी त्या दाव्यामागे अमेरिकेतील राजकीय संकटांचा संदर्भ दिला आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील जेफ्री एपस्टाईन प्रकरणाचा उल्लेख करत सांगितले की, या प्रकरणामुळे तेथील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. डेमोक्रॅटिक समितीने चौकशी थांबणार नसल्याचे संकेत दिले असून काही अहवाल सार्वजनिक करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टाईन यांचे एकत्रित १९ फोटो सार्वजनिक झाल्याने अमेरिकेत राजकीय वादळ उठले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी भारतातील सत्ताबदलाचा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, भाजपच्या Prithviraj Chavan नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. अमेरिकेतील काही कागदपत्रांवरून भारतातील पंतप्रधान कसे बदलू शकतात, असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. मराठी व्यक्ती पंतप्रधानपदी येणार असल्याचा आणि १९ डिसेंबरला पंतप्रधान बदलणार असल्याचा दावा निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मुद्दाम अफवा पसरवल्या जात असून गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कटाचा कांगावा केला जात असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे.पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे राज्यासह देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांचा भडका उडाला असून, १९ डिसेंबरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.