राळेगाव-वडकी मार्गावर भीषण अपघात; तीन ठार, तर एक गंभीर जखमी

सावंगी पेरका गावाजवळील घटना

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
ralegaon-vadki-road-accident : राळेगाव-वडकी मार्गावर विचित्र अपघातात दुचाकीवरील तीनजण ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार, 13 डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास सावंगी पेरका गावाजवळ घडली. आदेश दिलीप मरस्कोल्हे (वय 27), गोपाल मडकाम (वय 35), मोहन लक्ष्मण मेश्राम (तिघेही राळेगाव रहिवासी) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर अजय धनगर (धुलिया एमपी) असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राळेगाव येथील आदेश मरस्कोल्हे, गोपाल मडकाम व मोहन मेश्राम हे तिघेही शनिवारी रात्री एमएच9 एएक्स4461 या क्रमांकाच्या दुचाकीने काही कामानिमित्त राळेगाववरून वडकीच्या दिशेने जात होते.
 
 
 
acc
 
 
 
दरम्यान, राळेगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या सावंगी पेरका गावाजवळ एका सिल्व्हर रंगाच्या एमएच40 एआर4389 क्रमांकाच्या वॅगनार चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला समोरून जबर धडक दिली. धडक देऊन कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात दुचाकीवर बसून असलेले तिघेही गंभीर जखमी झाले होते.
 
 
 
अपघातस्थळी महामार्गावर नागरिकांची प्रचंड गर्दी जमल्याने यादरम्यान एक राळेगावकडून एमएच18 बीझेड1657 या क्रमांकाचा ट्रक सोयाबीन भरून वडकीकडे जात असता अपघातस्थळी थांबला होता. त्या ट्रकला मागून येणाèया ट्रक क्र. एमएच18 बीझेड1657 ने धडक दिल्याने त्या ट्रकचा चालक कॅबिनमध्ये फसल्यामुळे गंभीर जखमी झाला. ही माहिती राळेगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत फसलेल्या चालकाला नागरिकांच्या व जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले. यातील जखमीला राळेगावच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र अपघातातील आदेश मरस्कोल्हे याचा वाटेतच मृत्यू झाला. तर गोपाल मडकाम व मोहन मेश्राम यांचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी ट्रकचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
हा अपघात इतका विचित्र होता की घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती व महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली होती. यावेळी पांढरकवडा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल, राळेगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शितल मालटे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश दंदे, पोलिस उपनिरीक्षक विशाल बोरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन वाहतूक नियंत्रणात आणली. हा अपघात घडवून आणणाèया यातील वॅगनार चालकाला अटक करण्यासाठी पोलिसांनी लगेच तपासचक्र फिरवत अपघातातील कार ताब्यात घेतली. कारचालकावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याकरिता पोलिस ठाण्यात लावण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलिस करीत आहेत.