सेलू,
selu-accident : सुकळी स्टेशन शिवारात रेल्वे फाटक समोरील खड्ड्यामुळे दुचाकी अनियंत्रित होत झालेल्या अपघातात राम झाडे (३८), नीलेश गिरी (२७) दोघेही रा. हिंगणघाट दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज रविवार १४ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास झाला.
राम झाडे व नीलेश गिरी हे एम. एच. ३२ ए. वाय. १२८२ क्रमांकाच्या दुचाकीने हिंगणघाटकडून सेलूकडे येत होते. दुचाकी सुकळी स्टेशन भागातील रेल्वे फाटका जवळ आली असता रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी उसळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीवरील दोघेही जमिनीवर कोसळले. यात राम झाडे यांच्या डोयाला तर नीलेश गिरी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच प्रज्वल लटारे हे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमींना सेलूच्या ग्रामीण रुग्णालय दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे.