सेलू,
speeding-car-crash : सेलू शहरात शिकवणी वर्गातून सुटलेल्या विद्यार्थिनींना भरधाव कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना. आज रविवार १४ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. या अपघातात सात विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यातील एका विद्यार्थिनीचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. सर्व जखमींना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्ड क्र. ३, सेलू येथे राहणारे व पेशाने शिक्षक असलेले फिर्यादी गुड शेफर्ड शाळा, सेलू येथे कार्यरत असून पोलीस स्टेशनसमोरील सुभाष भुरे यांचे कॉम्प्लेक्समधील हॉलमध्ये मागील दहा वर्षांपासून शिकवणी वर्ग चालवितात. आज सकाळी ९ ते १० या वेळेत नववीच्या गणित विषयाचा वर्ग झाल्यानंतर विद्यार्थिनी वर्गाबाहेर पडत असताना अचानक रस्त्यावर आरडाओरड सुरू झाल्याने शिक्षक धावत बाहेर आले.
यावेळी पांढऱ्या रंगाची फोर्ड कंपनीची कारने (क्र. एमएच-३१/डीके-३०००) विद्यार्थिनींना धडक दिल्याचे दिसून आले. या अपघातात श्रिया शिंदे (रा. झडशी) ही कारच्या पुढील बाजूस अडकली होती. तिला तत्काळ बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, सेलू येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले.
याच अपघातात वैष्णवी गिरडकर, . अदिती वानोडे, रिद्धीमा भिवगडे, स्नेहा माहाकाळकर (सर्व रा. घोराड), तोषीका बोरकर (रा. गोंदापूर) व ओमेश्वरी आदगने (रा. सेलू) या विद्यार्थिनींनाही मार लागला असून त्यांच्या सायकलींचे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर नागरिकांनी सर्व जखमी विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कारचालकाने आपले नाव सौरभ वाघमारे (रा. सेलू) असल्याचे सांगितले. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.