वर्धा,
pankaj-bhoyar : राज्य राखीव बलातील अधिकारी, कर्मचार्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण केंद्र राज्यात दौंड जि. पुणे येथे आहे. सध्याच्या स्थितीत दुसरे केंद्र देणे अपेक्षित असल्याने ते केंद्र वर्धेत देण्यात यावे, अशी मागणी वर्धेचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य राखीव बलामध्ये सध्यस्थितीत २० गटांमध्ये जवळपास २६ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामधील अंदाजे २,५०० ते ३,००० अधिकारी कर्मचार्यांना नियमीत वार्षिक प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. या प्रशिक्षणाकरिता महाराष्ट्र राज्य राखीव बल प्रशिक्षण केंद्र दौंड जि. पुणे येथे आहे. त्या प्रशिक्षण केंद्राची क्षमता वर्षाला १५०० अधिकारी, कर्मचार्यांना प्रशिक्षित करता येईल एवढी आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा नियोजित वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शय होत नाही.
सद्यस्थितीत नागपूर व अमरावती विभागाचा विचार करता महाराष्ट्र राज्य राखीव बलाचे ११ गट कार्यरत आहेत. या गटांमध्ये जवळपास १० हजार अधिकारी, कर्मचारी आहेत. या विभागातील १९ गटांकरिता वर्धा येथे महाराष्ट्र राज्य राखीव बलाचे प्रशिक्षण केंद्र उभारल्यास या सर्व गटांमधील कर्मचार्यांना याच भागामध्ये नियमीतपणे प्रशिक्षण देणे शय होईल. तसेच त्यामुळे दौंड येथील प्रशिक्षण केंद्रावरील ताण कमी होण्यास मदत होईल. यामुळे महाराष्ट्र राज्य राखीव बलाच्या विदर्भ क्षेत्रातील सर्व गटांकरिता प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्याबाबत मान्यता देण्याची मागणी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केली.
इतिहासात मोठी नोंद होईल : ना. डॉ. भोयर
एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र वर्धा जिल्ह्यात रोजगार निर्मितीकरिता एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. वर्ध्याच्या विकासाकरिता भारतीय जनता पक्षाच्या शासनाकडून नेहमीच पुढाकार घेण्यात आला. जर येत्या काळात हे केंद्र वर्धेत मंजूर झाले तर ते वर्धेच्या इतिहासात मोठी नोंद होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.