नागपूर,
rajesh-mapuskar : प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या आणि भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला पुढील वर्षी दहा वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत, दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी नागपूरकरांच्या उदंड प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याच वेळी त्यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग ‘व्हेंटिलेटर २’ लवकरच प्रदर्शित होणार असल्याचा अधिकृत खुलासा करून रसिकांच्या अपेक्षा अधिक वाढवल्या.
ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन, नागपूर महानगरपालिका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, एनएफडीसी, मुक्ता आर्ट्स, सिने मॉन्टाज, सप्तक आणि पर्सिस्टंट सिस्टीम्स यांच्या सहकार्याने आयोजित पहिल्या दोन दिवसीय मराठी चित्रपट महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. या महोत्सवाला नागपूरकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. समारोपाच्या दिवशी सुरुवातीला रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल- मे ९९’, त्यानंतर राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ आणि शेवटी सुमित्रा भावे व सुनील सुखथनकर दिग्दर्शित ‘संहिता’ हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.
यावेळी रोहन मापुस्कर यांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधत, दूरध्वनीद्वारे राजेश मापुस्कर यांच्याशीही संवाद घडवून आणला. दरम्यान, ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल नागपूरकरांचे आभार व्यक्त करत येत्या ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ‘आरोग्य फिल्म फेस्टिवल’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर, नितीन सहस्रबुद्धे, विकास लिमये, मंजुषा जोशी यांच्यासह अनेक सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.