कारंजा लाड,
chivchiv-mandal : पी.एम.श्री.जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथील शिक्षक गोपाल खाडे यांनी अमरावती विभागीय स्तरावर शाळेतील विविध क्लब सादरीकरण स्पर्धेत चिवचिव मंडळ या पर्यावरण क्लबचे सादरीकरण करून विभागावर प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर आपली निवड पक्की केली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणार्या सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये विविध कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने विविध ४२ स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष २५-२६ ला आयोजन केले आहे. पी.एम.श्री. जिल्हा परिषद विद्यालय कामरगावचे उपक्रमशील शिक्षक गोपाल खाडे अमरावती विभागीय स्तरासाठी निवड झाली होती. बाबासाहेब धाबेकर डी. एड. कॉलेज अकोला येथे आयोजित स्पर्धेत आपले उत्तम सादरीकरण केले. २००६ ला स्थापन झालेल्या चिवचिव मंडळाची यशोगाथा गोपाल खाडे यांनी मांडली. विद्यार्थ्यांनी तयार केलेली चिमण्यांसाठी घरटी, घोषणा फलक व बर्ड फिडर याचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले. चिवचिव मंडळाची उद्दिष्टे, त्यांचा कृती कार्यक्रम व या चिवचिव मंडळाची फलश्रुती याचे उत्तम सादरीकरण करीत गोपाल खाडे यांनी विभागावर प्रथम क्रमांक पटकावला. चिवचिव मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला, हस्तकला पथनाट्य, कविता, लेखन, निबंध लेखन व स्टोन पेंटिंग सारख्या कला विकसित झाल्या.
हस्तलिखित लेखनाची कलाही विद्यार्थी शिकले. पक्ष्यासंदर्भात अनेक हस्तलिखित वर्ग ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली. याआधी या उपक्रमाची दखल घेत ऊर्जा व लिटिल प्लॅनेट या संस्थेने ’चिमण्यांची शाळा’ म्हणून या शाळेचा गौरव केला. महाराष्ट्रा तील ४०९ पर्यावरण पूरक शाळांचे प्रस्ताव यासाठी आले होते. त्यापैकी फक्त १३ शाळा निवडल्या होत्या. त्यामध्ये पी.एम.श्री.जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव या शाळेची निवड झाली होती. या उपक्रमासाठी पन्नास हजार रुपयांचे बक्षीसही दिले. सर फाउंडेशन आयआयएम अहमदाबाद आणि सर फाउंडेशन सोलापूर यांनी राज्यस्तरीय टीचर इनोव्हेशन अवार्ड देऊन गोपाल खाडे यांचा सत्कार केला. अरविंदो सोसायटी यांनी दिल्ली येथील माणेकशा हॉल येथे मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तराचा इनोव्हेशन पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
कामरगाव सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला चिमणी वाचवण्याचा हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर गेला. त्यावेळी एक लाख प्रस्ताव या पुरस्कारासाठी आलेले होते. त्यामधुन देशभरातून ६० शिक्षक निवडले गेले होते. त्यापैकी महाराष्ट्रातून गोपाल खाडे यांची निवड झाली होती. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना येथे राज्यस्तरीय क्लब सादरीकरण स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली. गोपाल खाडेचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या रत्नमाला खडके यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा आयोजक अधिकारी म्हणून प्रा. अंकोश ससाने तर परीक्षक म्हणून डॉ. संतोष गायकवाड, विजय अग्रवाल, डॉ. गजानन डोईफोडे यांनी काम पाहले. दीपक गव्हाळ, कु.कांचन जाधव यांनी सहकार्य केले. कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्रीकांत माने, विस्ताराधिकारी सुनील उपाध्ये, मुख्याध्यापक सुरेश राठोड, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी गोपाल खाडे यांचे अभिनंदन केले आहे.