तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
navodaya-exam : नवोदय विद्यालय समिती तथा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळद्वारा आयोजित जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे आयोजन शनिवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 पर्यंत जिल्ह्यातील 56 केंद्रावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यात 13 हजार 605 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 1095 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 14 हजार 700 विद्यार्थी परीक्षा प्रविष्ट होते. त्यापैकी तब्बल 13 हजार 605 विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा दिली. ही परीक्षा कडेकोट व कॉपी मुक्त वातावरणात घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मिना यांनी दिले होते. त्या दृष्टीने ही परीक्षा कडेकोट बंदोबस्तात घेण्यात आली.
विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारी व आयुष्याला कलाटणी देणारी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा वेध घेणारी चाचणी म्हणून या परीक्षेकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता सहावीमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते.
त्यासाठी विद्यार्थी पाचवी उत्तीर्ण असावा लागतो. तसेच इयत्ता नववीसाठी रिक्त जागासाठी ही परीक्षा घेतली जाते. त्यासाठी विद्यार्थी आठवी उत्तीर्ण असावा लागतो. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षणाची संधी मिळावी. या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
ही नवोदय प्रवेश परीक्षा माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, जवाहर नवोदय विद्यालय बेलोराचे प्राचार्य कमलाकर धोपटे यांच्या नियंत्रणात घेण्यात आली. परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी विस्तार अधिकारी स्मिता घावडे व प्रकाश येरमे यांनी काम पाहिले.