‘शुभमंगल सावधान...’साठी अजून 51 दिवस प्रतीक्षा

रविवारपासून शुक्रास्त सुरू

    दिनांक :14-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
yavatmal-news : तरुण-तरुणींना आता पुढील दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. शुक्राच्या अस्तामुळे आत पुढील दोन महिने विवाहाचे मुहूर्तच नाहीत. त्यामुळे भावी वधू-वरांना आता तब्बल 51 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. रविवार, 14 डिसेंबर 2025 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत ‘शुक्र अस्त’ आहे. त्यामुळे या काळातील एकही विवाह मुहूर्त नसल्याने गुरुजींकडून भावी वधू-वरांना दोन महिन्यांनी थांबण्याच्या सल्ला देण्यात येत आहे.
 
 

संग्रहित फोटो
 
 
 
घराण्यांना जोडणारे मंगल बंधन
 
 
विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती-पत्नी म्हणून विवाहाने एकत्र येतात. विवाह हे दोन व्यक्तींना आणि दोन घराण्यांना जोडणारे मंगल बंधन मानले जाते. त्यामुळे पंचांगानुसार मुख्य काळातील विवाह मुहूर्तांना’ प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते.
 
असे आहेत विवाह मुहूर्त (फेब्रुवारी ते जुलै 2026)
 
 
फेब्रुवारी : 3,5, 6, 7, 8, 10, 12, 20, 22, 25, 26. मार्च : 5, 7, 8, 12, 14, 15, 16, 20, 29. एप्रिल : 21, 26, 28, 29, 30. मे : 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13, 14. जून : 19, 20, 23, 24, 27. जुलै : 1, 2, 3, 4, 7, 8,9, 11.
 
14 डिसेंबरपासून शुक्रास्त
 
 
14 डिसेंबर 2025 ते 29 जानेवारी 2026 या काळात शुक्र अस्त आहे. त्यामुळे मुख्य विवाह मुहूर्त उपलब्ध नाहीत. यामुळेच बोहल्यावर चढण्यासाठी 51 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
 
गौणकाळातील तिथी
 
 
डिसेंबर महिन्यात 12, 13, 15, जानेवारी महिन्यात 20, 23, 24, 25, 26, 28, 29 या तिथी ‘आपत्कालीन व गौणकाळातील तिथी’ मानल्या जातात. मुहूर्त नसले तरी विवाहासाठी ‘गौणकाळातील आपत्कालीन तिथी’ पंचांगकर्त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
 
गौणकाळात कोण करू शकतात विवाह ?
 
 
गौणकाळातील (आपत्कालीन) तिथींवर फक्त विशिष्ट परिस्थितीतच विवाह केला जाऊ शकतो. साखरपुडा आधी झालेला असेल, घरात कोणी आजारी असेल, वधू-वर परदेशात किंवा दूरस्थ नोकरीवर असतील व इतर तातडीच्या कौटुंबिक कारणांमुळे विलंब शक्य नसल्यास विवाह करता येऊ शकतात.
 
पर्याय उपलब्ध
 
 
शुक्राचा अस्त असल्यामुळे विवाह इच्छुक तरुण-तरुणींना आता दोन महिने थांबावे लागणार आहे. या काळात गौणकाळातील तिथी उपलब्ध आहेत. नोकरीवर व कौटुंबिक कारणांमुळे तातडीचा मुहूर्त हवा असेल, तर याचा विचार करता येऊ शकतो.