सिडनी,
16 killed in Sydney terrorist attack सिडनीतील बोंडी बीच परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृतांचा आकडा १६ वर पोहोचला असून या घटनेने संपूर्ण ऑस्ट्रेलियाला हादरवून सोडले आहे. रविवारी हनुक्का या ज्यू सणाच्या उत्सवाच्या वेळी दोन दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या अंधाधुंद गोळीबारात एका मुलासह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिस कारवाईदरम्यान एका हल्लेखोराला घटनास्थळी ठार करण्यात आले, तर दुसरा हल्लेखोर गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
न्यू साउथ वेल्सचे पोलिस आयुक्त मेल लॅनियन यांनी सांगितले की या हल्ल्यात सहभागी असलेले संशयित वडील आणि मुलगा होते. त्यापैकी ५० वर्षीय वडिलांचा गोळी लागून मृत्यू झाला, तर २४ वर्षीय मुलाची प्रकृती सध्या गंभीर पण स्थिर आहे. पोलिसांनी हल्लेखोरांच्या जवळील वाहनातून स्फोटकेही जप्त करून ती निष्क्रिय केली आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत याला दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट केले. यहूदी समाजाविरोधातील द्वेष मुळापासून संपवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. हा द्वेष समाजासाठी एक शाप असून तो नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या हल्ल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही निषेध केला असून त्यांनी याला अत्यंत भयानक घटना म्हटले आहे. तसेच एफबीआयने ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणांना सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. न्यू साउथ वेल्सचे आरोग्यमंत्री रायन पार्क यांनी सांगितले की रात्री मृतांची संख्या १२ वरून १६ झाली, ज्यामध्ये १२ वर्षांच्या एका मुलाचाही समावेश आहे. याशिवाय आणखी तीन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना संपूर्ण समाजासाठी, विशेषतः ज्यू समुदायासाठी अत्यंत धक्कादायक असून, काल रात्री मानवतेचे सर्वात भीषण रूप पाहायला मिळाले, असेही त्यांनी सांगितले.