धरमशाला,
Aiden Markram faced defeat धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करामने पराभवामागचे खरे कारण स्पष्ट केले. कोणत्याही भारतीय गोलंदाजाचे नाव न घेता, भारतीय वेगवान गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटसारख्या अचूक लाईन आणि लेंथने गोलंदाजी केल्यामुळे आपल्या संघाला जलद धावा करता आल्या नाहीत, असे त्याने सांगितले. मार्करामने अर्धशतकी खेळी करत ६१ धावा केल्या असल्या तरी दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे योग्य ठरला. धर्मशालाच्या चांगल्या फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या खेळपट्टीवरही भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या संघाला सुरुवातीलाच दबावाखाली आणले.

अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात रीझा हेंड्रिक्सला बाद करून दक्षिण आफ्रिकेच्या डावाला मोठा धक्का दिला. त्यानंतर हर्षित राणाने क्विंटन डी कॉक आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांना तंबूत पाठवत संघाला अडचणीत टाकले. एकामागोमाग एक विकेट पडत गेल्याने दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज सावरू शकले नाहीत. एका टोकाला कर्णधार मार्कराम टिकून राहिला, मात्र दुसऱ्या टोकावर विकेट्सची पडझड सुरूच राहिली आणि अखेर संघ ११७ धावांवर गारद झाला. सामन्यानंतर बोलताना मार्कराम म्हणाला की भारतीय वेगवान गोलंदाजांनी योग्य क्षेत्रात सातत्याने मारा केला आणि त्यामुळे संघाने लवकरच चार ते पाच विकेट्स गमावल्या. भविष्यात अशा परिस्थितीत अधिक आक्रमक खेळून गोलंदाजांवर दबाव टाकण्याची गरज असल्याचेही त्याने नमूद केले. जर संघ १४० ते १५० धावांपर्यंत पोहोचू शकला असता, तर सामना अधिक चुरशीचा झाला असता, असेही तो म्हणाला.
११८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. सलामीवीर अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत संकेत दिले. अवघ्या १८ चेंडूंमध्ये ३५ धावा करत त्याने सामना दक्षिण आफ्रिकेपासून दूर नेला. अभिषेकच्या खेळीचे कौतुक करताना मार्कराम म्हणाला की सुरुवातीच्या काही षटकांत दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज योग्य लाईन आणि लेंथ राखू शकले नाहीत, ज्याचा फटका संघाला बसला. अखेर भारताने २५ चेंडू शिल्लक असताना सात विकेट्सने हा सामना जिंकत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील चौथा टी-२० सामना १७ डिसेंबर रोजी लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.