मुंबई,
TV actor Anuj Sachdeva टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडवणारी एक गंभीर घटना समोर आली असून, प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अनुज सचदेव यांनी मुंबईतील गोरेगाव परिसरातील त्यांच्या राहत्या सोसायटीत आपल्यावर हिंसक हल्ला झाल्याचा दावा केला आहे. सोसायटीतीलच एका रहिवाशाने शारीरिक मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अनुज यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी स्वतः मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनुज सचदेव ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘साथ निभाना साथिया’ आणि ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात लाठी घेऊन त्यांच्यावर वार करताना आणि अश्लील शिवीगाळ करताना स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित व्यक्ती सतत आक्रमक होत “कुत्र्याने चावल्याचा” आरोप करत अनुज यांना धमकावत असल्याचेही व्हिडिओत ऐकू येते.अनुज यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला सोसायटीतील पार्किंगच्या वादातून वाद झाला. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांच्या पाळीव कुत्र्यावर आणि स्वतः अनुज यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यादरम्यान आरोपीने अनुज यांना जीवे मारण्याची धमकी दिली. व्हिडिओमध्ये पार्श्वभूमीवर एका महिलेचा आवाज ऐकू येतो, जी वॉचमनला बोलावण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळातच सुरक्षा रक्षक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला अनुज यांच्यापासून दूर केले.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत अनुज कॅमेऱ्यासमोर आले असून त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे त्यांनी दाखवले. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, भविष्यात त्यांना किंवा त्यांच्या मालमत्तेला काही धोका निर्माण झाल्यास हा व्हिडिओ पुरावा म्हणून उपयोगी ठावा, यासाठीच तो सार्वजनिक करत आहेत. त्यांनी सोसायटीचे नाव आणि आरोपीचा फ्लॅट नंबरदेखील शेअर करत संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.या घटनेनंतर टीव्ही इंडस्ट्रीतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अभिनेत्री किश्वर मर्चंटने कमेंटमध्ये “हे तर वेडापणाच आहे, तू ठीक आहेस ना?” अशी चिंता व्यक्त केली, तर सिंपल कौरने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. विवान भटेना, नौहीद सेरुसी यांच्यासह अनेक कलाकारांनी या प्रकाराबद्दल संताप आणि धक्का व्यक्त केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, अनुज सचदेव हे गेल्या अनेक वर्षांपासून कुत्र्यांच्या हक्कांसाठी, विशेषतः भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी सक्रियपणे आवाज उठवत आहेत. ते आपल्या पाळीव कुत्रा ‘सिम्बा’सोबत अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दिसतात आणि जबाबदारीने पाळीव प्राणी दत्तक घेण्याचा व त्यांची काळजी घेण्याचा संदेश देत आले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि सोसायटीतील अंतर्गत वादांच्या वाढत्या घटनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.