नवी दिल्ली,
AQI 490 Par in Akshardham area दिल्ली आणि एनसीआरमध्ये तीव्र थंडी असूनही वायू प्रदूषणातून अद्याप दिलासा मिळालेला नाही. राजधानीवर धुराचे जाड आवरण पसरले असून अनेक भागांत हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दिल्लीतील सरासरी AQI सुमारे ४७० नोंदवला गेला असून ही पातळी ‘गंभीर’ श्रेणीत मोडते. दिल्लीच्या विविध भागांतील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. सरदार पटेल मार्गावर AQI ४८३, पंडित पंत मार्गावर ४१७, बरखांबा रोडवर ४७४, द्वारका सेक्टर-१४ येथे ४६९ तर बारापूल्लाह उड्डाणपुलावर ४३३ अशी नोंद झाली आहे. अक्षरधाम परिसरात तर AQI ४९० च्या पुढे जात ४९३ पर्यंत पोहोचल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रदूषणासोबतच दाट धुक्यामुळेही दिल्लीतील अनेक भागांत दृश्यमानता मोठ्या प्रमाणात घटली आहे. रस्त्यांवर वाहनांची गती मंदावली असून चालकांना हेडलाईट लावून सावधपणे वाहन चालवावे लागत आहे. सकाळच्या वेळेत बाराखंबा रोड आणि पंडित पंत मार्गावर धुक्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार AQI ० ते ५० दरम्यान असला तर हवा ‘चांगली’ मानली जाते, ५१ ते १०० ‘समाधानकारक’, १०१ ते २०० ‘मध्यम’, २०१ ते ३०० ‘खराब’, ३०१ ते ४०० ‘अतिशय वाईट’ आणि ४०१ ते ५०० ‘गंभीर’ श्रेणीत गणला जातो. ‘गंभीर’ पातळीवरील प्रदूषण निरोगी व्यक्तींनाही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो बाहेर जाणे टाळावे तसेच उघड्यावर व्यायाम किंवा दीर्घकाळ वास्तव्य करू नये, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.