देवळी,
Boma technique देवळी—पुलगाव विधानसभा क्षेत्रासह वर्धा जिल्ह्यात शेतकर्यांना भेडसावणार्या वन्यप्राणी—मानव संघर्षाच्या गंभीर प्रश्नावर आ. राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोमा तंत्राचा वापर करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
नीलगाय, रोही, हरीण व रानडुक्कर यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकर्यांचे उभे पीक उद्ध्वस्त होत असून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आ. बकाने यांनी केली. आ. बकाने यांनी मध्यप्रदेश शासनाने यशस्वीपणे राबविलेल्या ‘बोमा तंत्रा’चा दाखला देत ही आधुनिक व सुरक्षित पद्धत महाराष्ट्रातही तातडीने अमलात आणण्याची आवश्यकता व्यत केली. दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञ संस्थेच्या सहकार्याने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने राबविण्यात आलेल्या या अभियानात कोणत्याही प्राण्याला इजा न करता, बेशुद्ध न करता, थेट फायबर नेटद्वारे बंदिस्त मार्गात पकडून राखीव जंगलात स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली.
मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात अवघ्या ११ दिवसांत ९१३ नीलगाय व हरणांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान थांबले असून मानव—वन्यजीव संघर्षात लक्षणीय घट झाल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यात विशेषतः देवळी—पुलगाव मतदारसंघात या प्रयोगाची सुरुवात केल्यास शेतकर्यांना दिलासा मिळेल आणि वन्यजीव संवर्धनालाही चालना मिळेल, असे मत त्यांनी मांडले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवेदनाची दखल घेत वन्यप्राणी—मानव संघर्ष हा गंभीर विषय असून, त्यावर शास्त्रीय आणि दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे मत व्यत केले. संबंधित विभागांकडून या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घेण्याबाबत सकारात्मक भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याचे आ. बकाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून कळवण्यात आले.