मुंबई,
Dhurandhar was shot in Pakistan सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे. २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या सिनेमाने आपले स्थान निश्चित केले असून, कथानक, पात्रे आणि मांडणी यामुळे तो सतत चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या यशासोबतच सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. ‘धुरंधर’चे शूटिंग थेट पाकिस्तानमध्ये झाले का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. चित्रपटातील सुमारे ८० टक्के दृश्ये पाकिस्तानमध्ये घडत असल्याचे दाखवण्यात आल्यामुळे हा गैरसमज पसरला. मात्र, प्रत्यक्षात या चित्रपटाचे शूटिंग पाकिस्तानमध्ये झालेले नाही, अशी स्पष्ट माहिती आता समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे तिथे भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण करणे शक्य नसल्याने निर्मात्यांनी वेगळा मार्ग अवलंबला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर’चा मोठा भाग भारतातच शूट करण्यात आला आहे. पंजाबमधील चंदीगड आणि लुधियाना येथे अनेक महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण झाले, तर कराचीतील ल्यारी भाग दाखवण्यासाठी मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये भव्य सेट उभारण्यात आला होता. याशिवाय लडाख आणि नवी दिल्ली येथेही काही दृश्ये शूट करण्यात आली असून, चित्रपटातील काही भाग बँकॉकमध्ये चित्रित करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर चित्रपटात रहमान डकैतच्या भावाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दानिश पंडोर यांनीही शिक्कामोर्तब केले आहे. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘धुरंधर’चे शूटिंग पाकिस्तानमध्ये झालेले नाही. त्यांनी विविध लोकेशन्सचा उल्लेख करत या अफवांना पूर्णविराम दिला. दरम्यान, प्रदर्शित होऊन अवघे सहा दिवस झाले असतानाच ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत देशांतर्गत बाजारात चित्रपटाने सुमारे १७० कोटी रुपयांची कमाई केली असून, जागतिक स्तरावर हा आकडा जवळपास २०० कोटींवर पोहोचला आहे. अफवांवर पडदा टाकत, ‘धुरंधर’ सध्या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे