नागपूर,
fake Shalarth ID scam राज्यभर खळबळ उडवणाऱ्या बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा वेग आला असून, विशेष तपास पथक आणि सायबर शाखेने आतापर्यंत २४ जणांना अटक केली आहे. यातील बहुतांश आरोपी सध्या जामिनावर मुक्त आहेत. तपासाच्या दुसऱ्या टप्प्यातील कारवाई पूर्ण करून पोलीस येत्या दोन दिवसांत सत्र न्यायालयात दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय झाल्याने या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींमध्ये अटकेची भीती निर्माण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ४५० पानांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार असून, या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र असणार आहे. यापूर्वी पोलिसांनी ६३२ पानांचे सविस्तर आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये १० आरोपींवर दोषारोप ठेवण्यात आले होते.
त्यानंतर तपासाच्या fake Shalarth ID scam दुसऱ्या टप्प्यात पोलिसांनी आणखी १४ जणांना अटक केली. त्यांच्या सखोल चौकशीनंतर कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत आरोपपत्र तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तपासात असे उघडकीस आले आहे की, आरोपींनी पदाचा गैरवापर करत तब्बल ६६२ बनावट शालार्थ ओळखपत्रे तयार केली आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सायबर शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, येत्या दोन दिवसांत हे पुरवणी आरोपपत्र न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या जामिनावर सुटलेल्या आरोपींमध्ये अस्वस्थता पसरली असून, पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष तपास पथक आणि सायबर शाखा समांतरपणे या घोटाळ्याची पाळेमुळे उखडून काढत आहेत. या दोन्ही यंत्रणांनी मिळून आतापर्यंत २४ जणांना अटक केली असून, त्यापैकी १० जणांना सायबर शाखेने तर १४ जणांना विशेष तपास पथकाने अटक केली आहे. यापूर्वी नरड, नाईक आणि वंजारी या तिघांवर दोन्ही तपास यंत्रणांनी संयुक्त कारवाई केली होती.या प्रकरणातील पुढील घडामोडींमुळे आणखी कोणाची भूमिका समोर येते का, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.