मुझफ्फरपूर,
Father commits suicide with daughters बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील साक्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिश्रुलिया गावात सोमवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली. आर्थिक व कौटुंबिक तणावातून एका वडिलांनी आपल्या पाच लहान मुलांसह गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेत वडील आणि त्यांच्या तीन मुलींचा मृत्यू झाला असून दोन लहान मुले सुदैवाने बचावली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महादलित समाजातील अमरनाथ राम (वय ४०) यांनी रविवारी रात्री आपल्या घरात ही टोकाची पायरी उचलली. त्यांनी आपल्या तीन मुली राधा कुमारी (११), राधिका (९) आणि शिवानी (७) तसेच दोन मुले शिवम (६) आणि चंदन (४) यांच्यासोबत गळफास घेतला. या घटनेत अमरनाथ राम आणि त्यांच्या तीन मुलींचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, शिवमच्या गळ्याभोवती फास अडकल्याने त्याचा श्वास कोंडत असल्याचे लक्षात येताच त्याने कसाबसा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने धैर्य दाखवत आपल्या धाकट्या भावाच्या, चंदनच्या गळ्यातील फास काढून टाकला आणि त्याचा जीव वाचवला. दोन्ही मुले जोरजोरात रडू लागल्यानंतर शेजारी-पाजारी घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अमरनाथ राम यांच्या पत्नीचा काही काळापूर्वीच मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून ते मानसिक तणावात होते. मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.