कुरखेडा,
Kurkheda Sonsari Village गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सोनसरी ग्रामपंचायतीत माजी ग्रामसेविका एन. एन. कुमरे यांच्यावर सुमारे 25 लाख रुपयांच्या आर्थिक अपहाराचा आरोप आहे. याबाबत ग्रामस्थांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी 103 सह्या असलेले निवेदन गट विकास अधिकारी धीरज पाटील यांना सादर केले होते. पाटील यांनी तत्काळ चौकशी व कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. ग्रामस्थांच्यावतीने 17 डिसेंबरच्या सकाळी 10 वाजतापासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा गट विकास अधिकारी धीरज पाटील यांना पत्राद्वारे दिला आहे.
या पत्राद्वारे माजी Kurkheda Sonsari Village ग्रामसेविका एन. एन. कुमरे यांच्यावर तत्काळ निलंबन व फौजदारी गुन्हा दाखल करावा, 15 दिवसांत विशेष ऑडिट पूर्ण करून अहवाल ग्रामसभेपुढे सादर करावा, अपहाराची रक्कम ग्रामपंचायत खात्यात परत जमा करून घ्यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. आम्ही शांततापूर्ण मार्गाने मागण्या मांडत आहोत. ग्रामसभेत दोनदा ठराव होऊनही हिशोब सादर झाला नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावाच्या विकासाचा निधी अपहार झाला आहे. आम्ही मागे हटणार नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला गावातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे.
जर या तीनही मागण्या 16 डिसेंबरच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लेखी स्वरूपात मान्य करून आदेश काढले नाहीत, तर उपोषण अनिवार्यपणे सुरू होईल व आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे. आता ग्रामस्थांच्या उपोषणाची दखल जिल्हा प्रशासन घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.