नागपूर,
Gatha Shri Ram Mandir Ki, कुडकुडत्या थंडीतही ‘जय श्रीराम’च्या घोषात रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या ‘गाथा श्रीराम मंदिर की’ या संगीतमय महागाथेने नागपूरकरांना भावनिक व वैचारिक प्रवास घडवला. त्याग, संघर्ष, बलिदान आणि अखेरच्या स्वप्नपूर्तीचा इतिहास अनुभवताना उपस्थित रसिक भारावून गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य आणि प्रकाश राजूरकर मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील व्हॉलीबॉल मैदानावर आयोजित करण्यात आला. प्रकाश राजूरकर मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित आणि मोहित शेरवानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रस्तुतीचे लेखन प्रबुद्ध सौरभ यांनी केले होते.

मोहित शेरवानी यांनी सहगायक व वादकांच्या मदतीने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राचीन इतिहासापासून १५२६ मधील विध्वंस, पाचशे वर्षांचा संघर्ष, कायदेशीर लढाया आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे उलगडला. २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिर उद्घाटन आणि २५ नोव्हेंबर २०२५ रोजी मंदिरावर धर्मध्वज फडकण्यापर्यंतचा ऐतिहासिक टप्पा सादर करण्यात आला. “दिप जलाओ, मंगल गाओ… राम आये है अयोध्या” या गीताने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात अनेक भक्तिरसपूर्ण गीतांनी वातावरण भक्तिमय झाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून साकारलेल्या दृकश्राव्य सादरीकरणामुळे श्रीराम मंदिराचा इतिहास नव्या पिढीसमोर जिवंत झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समिती आणि सहकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.