नवी दिल्ली
Gil on Abhishek's big statement शुभमन गिल सध्या खराब फॉर्ममधून जात असला तरी त्याच्यावरचा विश्वास अजूनही कायम असल्याचे अभिषेक शर्माने स्पष्ट केले आहे. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षापासून शुभमन गिलसोबत क्रिकेट खेळत असलेल्या अभिषेकला पूर्ण खात्री आहे की गिल लवकरच आपल्या फॉर्ममध्ये परत येईल आणि भारतासाठी टी-२० सामन्यांसह आगामी टी-२० विश्वचषकातही निर्णायक भूमिका बजावेल. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला वगळून शुभमन गिलला टी-२० संघात संधी दिल्यामुळे निवड समितीवर प्रश्न उपस्थित झाले होते. गिलने आतापर्यंत १५ डावांमध्ये १३७.३ च्या स्ट्राइक रेटने केवळ २९१ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातही त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि त्याने २८ चेंडूत २८ धावा केल्या.

गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या फॉर्मबाबत विचारले असता अभिषेक शर्माने ठाम भूमिका मांडली. तो म्हणाला की लोकांनी या दोन्ही खेळाडूंवर विश्वास ठेवायला हवा, कारण ते केवळ या मालिकेतच नव्हे तर विश्वचषकातही भारतासाठी सामने जिंकून देण्याची क्षमता ठेवतात. विशेषतः शुभमन गिलबाबत बोलताना अभिषेकने सांगितले की तो त्याला खूप वर्षांपासून ओळखतो आणि कोणत्याही संघाविरुद्ध तसेच कोणत्याही परिस्थितीत धावा काढण्याची ताकद गिलमध्ये आहे. अभिषेकने पुढे म्हटले की सुरुवातीपासूनच त्याचा शुभमनवर पूर्ण विश्वास आहे आणि लवकरच चाहत्यांनाही पुन्हा त्याच्यावर विश्वास वाटेल. तिसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या १८ चेंडूत ३५ धावा करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून देणाऱ्या अभिषेकने आपल्या खेळीबाबतही भाष्य केले. डिसेंबरमधील हवामान लक्षात घेऊन फलंदाजी केल्याचे त्याने सांगितले. चेंडू स्विंग किंवा सीम होत असल्याची जाणीव ठेवूनच काही विशिष्ट शॉट्स खेळावे लागतात आणि तसेच शॉट्स आपण या विकेटवर खेळल्याचेही त्याने स्पष्ट केले.