मुंबई,
Kis Kisko Pyaar Karoon 2 देशातील नामवंत कॉमेडियन कपिल शर्मा यांची लोकप्रियता प्रचंड असून त्यांचा कॉमेडी शो पाहण्यासाठी देश-विदेशातील प्रेक्षक उत्सुक असतात. विनोदासोबतच अभिनय आणि आवाजाच्या जादूमुळे कपिल यांनी मनोरंजनविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. टीव्हीवर यश मिळवल्यानंतर कपिल यांनी चित्रपटसृष्टीतही आपले नशीब आजमावले असून, 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि बॉक्स ऑफिसवरही त्याने समाधानकारक कामगिरी केली होती.
आता तब्बल दहा वर्षांनंतर ‘किस किसको प्यार करूं 2’ हा त्या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला असून, रिलीज होऊन तीन दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, या नव्या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे दमदार सुरुवात मिळालेली नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने 1.85 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी कलेक्शन 2.50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. तिसऱ्या दिवशीही फार मोठी उसळी न घेता चित्रपटाने 2.85 कोटी रुपये कमावले. अशा प्रकारे पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 7.20 कोटी रुपयांवर जाऊन थांबले आहे.
भारतामध्येच नव्हे तर परदेशातील बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. उपलब्ध अहवालांनुसार, ओव्हरसीज मार्केटमध्ये पहिल्या दोन दिवसांत चित्रपटाने केवळ 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. देशांतर्गत आणि परदेशातील मिळून आतापर्यंतचे एकूण कलेक्शन सुमारे 8.55 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचे सांगितले जात आहे.
या कलेक्शनकडे पाहता, ‘किस किसको प्यार करूं 2’ साठी पुढील वाटचाल आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. चित्रपटाचा अंदाजे बजेट सुमारे 25 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे म्हटले जात असून, सध्याच्या कमाईच्या वेगानुसार बजेट वसूल करणेही कठीण ठरू शकते. येत्या दिवसांत वीकडेज कलेक्शनमध्ये वाढ होते का, यावरच चित्रपटाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.