सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कर्मकांड प्रशिक्षणाचा नवा मार्ग

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात दोन लघु प्रमाणपत्र अभ्यासक्रम

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Kumbh Mela 2027 महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकाराने आणि नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने विशेष पूजाविधी व पौरोहित्य प्रशिक्षणावर आधारित दोन लघु प्रमाणपत्र अभ्यासक्रम विकसित केले आहेत.
 

Kumbh Mela 2027 
हे अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राबविले जाणार आहेत. सिंहस्थ पर्वाच्या निमित्ताने धार्मिक सेवा, पौरोहित्य आणि पूजाविधी क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगार संधी लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. सनातन धर्माच्या प्रचार-प्रसारासोबतच युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने नाशिक सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसीय कर्मकांड प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण वर्ग महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वेदवैदिक विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी अखंडानंद वेद-वेदांग महाविद्यालय, श्री कैलास मठ, नाशिक येथे होणार आहे.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन १६ डिसेंबर रोजी आभासी माध्यमातून करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू अतुल वैद्य यांच्या निर्देशानुसार या उपक्रमासाठी मार्गदर्शक समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष वेदविद्या संकायाचे अधिष्ठाता हरेकृष्ण अगस्ती असून, सचिव म्हणून वेद विज्ञान विभागाचे प्रमुख अमित भार्गव कार्यरत आहेत. समितीमध्ये व्याकरण विभागाचे प्रमुख जयवंत चौधरी आणि शास्त्रविद्या गुरुकुलाचे वेद प्राध्यापक निशांत मिश्रा यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणातून सहभागी युवकांना शासकीय मान्यता प्राप्त प्रमाणपत्र, कुंभमेळ्यात कार्य करण्याची संधी तसेच कौशल्य विकास व उद्योजकतेत वाढ होणार आहे. महाकुंभ हा आज केवळ श्रद्धेचा उत्सव न राहता जागतिक संवादाचे माध्यम ठरत असून, या उपक्रमातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेच्या अधिष्ठानावर धर्म, संस्कृती आणि सेवाभावाचा प्रसार होण्यास मदत होणार आहे.