लाखांदूर
Lakhandoor Case लाखांदूर शहरात ६ डिसेंबर रोजी भर दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. शहरातील अवघ्या पाच वर्षीय मुलीवर एका १५ वर्षीय परप्रांतीयाकडून अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय सध्या दहशतीत असून आरोपीकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने १५ डिसेंबर रोजी ‘लाखांदूर बंद’ची हाक देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना बसस्टॉप गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत सदर पीडित बलिकेच्या न्याय मिळावे यासाठी शेकडो च्या संख्येने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो महिला पुरुष सर्व जातीधर्माचे लोक एकवटून तहसिल कार्यालयावर धडकले. व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात आरोपी व त्याच्या कुटुंबीयांना तात्काळ लाखांदूर तालुक्यातून हद्दपार करण्यात यावे, आरोपीने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करावी, तसेच पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याला जामीन मिळू नये, यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा ठोठावावी, अशी भूमिका नागरिकांनी मांडली.
यासोबतच आरोपीच्या कुटुंबाकडे असलेले कथित बेकायदेशीर आधार कार्ड, रेशन कार्ड व रहिवासी दाखले तात्काळ रद्द करून ते तयार करून देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शहरात रोजगारासाठी किंवा फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांची पोलीस नोंदणी, मूळ रहिवासी कागदपत्रांची पडताळणी व संशयास्पद व्यक्तींची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद आहे.परप्रांतीयांना घरे भाड्याने देणाऱ्यांनी पोलिसांना पूर्वसूचना देणे बंधनकारक करावे, तसेच फुटपाथवरील बेकायदेशीर दुकाने व व्यवसायांची तपासणी करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना शहराबाहेर हद्दपार करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.१५ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या ‘लाखांदूर बंद’ला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळा, महाविद्यालये, दुकाने, पानठेले तसेच निमशासकीय आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
पाच वर्षीय चिमुकलीवरील अमानवी अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘लाखांदूर बंद’ दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लाखांदूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात शांतता अबाधित राहावी यासाठी पोलीस सतर्क होते.लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अमानवी घटनेच्या निषेधार्थ १५ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या बंद व निषेध मोर्चाला जामा मस्जिद अरबी मदरसा व कब्रस्तान लाखांदूर यांच्या वतीने समर्थन देण्यात आले. संबंधित संस्थांशी जोडलेले नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.