नागपूर,
mla visit smriti bhavan मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या आमदारांनी रविवारी सकाळी रेशीमबागेतील स्मृती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून यानिमित्ताने हे आमदार उपराजधानीत आले आहेत. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस असल्याने सकाळीच या सर्वांनी रेशीमबाग गाठले. या आमदार, मंत्र्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, चंद्रकात पाटील, आकाश फुंडकर, पंकजा मुंडे, दादा भुसे, नीतेश राणे, जयकुमार रावल, शंभुराज देसाई, योगेेश कदम, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, मेघना बोर्डीकर, डॉ. पंकज भोयर, आशीष जयस्वाल, शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते.
या शिवाय सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दटके, मोहन मते, श्रीकांत भारतीय, सदाभाऊ खोत, संजय कुटे निलेश राणे, अतुल भातखळकर, निरंजन डावखरे, समीर कुणावार, परिणय फुके, चैनसुख संचेती, सुरेश धस, निलेश राणे, अर्जुन खोपकर, अमित साटम, भरत गोगावले. चरणसिंह ठाकूर आदींसह महायुतीच्या आमदारांची उपस्थिती होती. मात्र, काही सत्ताधारी मंत्री व आमदारांनी रेशीमबागकडे पाठ फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) एकही मंत्री वा आमदार यंदाही आले नव्हते. संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या भेटीचे एक आगळे महत्त्व आहे. रविवारी अखेरच्या दिवशी महायुतीतील सर्व आमदारांना रेशीमबागेत येण्याचे निमंत्रण देण्यात आले. सकाळी साडेसात वाजेनंतर आमदार व मंत्री रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात पोहोचले. त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दरवर्षी संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र, यंदा ते टाळण्यात आले. संघाचे अ.भा. सह संपर्क प्रमुख सुनील देशपांडे, ज्येष्ठ प्रचारक विकास तेलंग, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, डॉ. हेडगेवार स्मारक समितीचे अभय अग्निहोत्री यांनी सर्वांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, येथे आल्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रप्रेम व देशभक्तीची वेगळी अनुभूती मिळते. येथून समाजसेवा व राष्ट्रसेवेची प्रेरणा घेऊन कार्यकर्ते कार्यरत होतात. देशभरच नव्हे तर जगभर रा.स्व. संघाच्या शााखा कार्यरत असून, हे संघटनात्मक सामर्थ्य उल्लेखनीय आहे. संघ शताब्दी साजरी करतोय. डॉ. मोहनजी भागवत यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना सातत्यानमे प्रेरणा देणारे असून समाजसेवा, राष्ट्रसेवेचे बळ त्यातून मिळते. नागपूर केवळ उपराजधानी नसून संघाची जन्मभूमी आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. निलम गोऱ्हे
यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या की, देशात विघटनवादी शक्ती विविध प्रकारे सक्रिय असताना राष्ट्रात सकारात्मक, प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे यासाठी संघ सातत्याने संस्कार, विधायक व रचनात्मक कार्य करत आहे. त्या कार्याची माहिती आम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून आहे.mla visit smriti bhavan माझे स्वतःचे काहीही नाही, माझे आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित आहे, ही संघाची विचारसरणी आहे. सामान्य माणसाला असामान्य घडवणारे संघटन म्हणून रा. स्व. संघाची भूमिका अत्यंत गौरवास्पद वाटते. गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात सुरू असलेल्या संघाच्या कार्यातून गुणवत्ता वाढवण्याची दिशा कशी दिली जाते, याचे स्पष्ट उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळाले.
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक विविध क्षेत्रात काम करतात. वेळ मिळेल तसे ते इथे दर्शनासाठी येतात. डॉ. हेडगेवार व गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेतात. आमच्यासाठी हे तिर्थक्षेत्र आहे.