नवी दिल्ली,
Pahalgam Terror Attack पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जवळपास आठ महिन्यांनंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणात मोठा खुलासा करत जम्मूतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएच्या तपासात हल्ल्यात थेट सहभागी असलेले तीन दहशतवादी लष्कराच्या ‘ऑपरेशन महादेव’दरम्यान ठार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दहशतवाद्यांची ओळख सुलेमान शाह उर्फ फैसल जट्ट उर्फ हाशिम मुसा, हमजा उर्फ हमजा अफगाणी आणि जिब्रान उर्फ जिब्रान भाई अशी करण्यात आली आहे. तपासादरम्यान हल्ल्याला मदत करणाऱ्या स्थानिक व्यक्तींचीही नावे समोर आली आहेत. हल्ल्याच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांना रसद, निवारा आणि मदत पुरवणारे बशीर अहमद जोथर, परवेझ अहमद जोथर आणि मोहम्मद युसूफ कटारी यांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.

एनआयएच्या म्हणण्यानुसार बशीर आणि परवेझ हे पहलगाम परिसरातील स्थानिक रहिवासी असून त्यांनी २१ एप्रिलच्या रात्री हिल पार्क परिसरातील एका ढोकमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. या दोघांना हल्ल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी, २२ जून रोजी अटक करण्यात आली. तपासात जोथर बंधूंच्या मोबाईल फोनमध्ये पाकिस्तानी क्रमांक आढळून आले असून त्यांचे थेट संपर्क पाकिस्तानशी असल्याचे संकेत मिळाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत तिन्ही हल्लेखोर हे पाकिस्तानी नागरिक असून बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची कबुली दिल्याचे एनआयएने सांगितले आहे. आरोपपत्रात लष्कर-ए-तैयबा तसेच त्याची प्रॉक्सी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) यांचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक कारवाई केली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आलेल्या या मोहिमेत लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांसह प्रशिक्षण केंद्रे आणि दहशतवादी कारवायांची आखणी होत असलेल्या एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईमुळे भारताविरोधातील दहशतवादी कटांना मोठा धक्का बसल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.