बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय रोहितचा दुर्दैवी मृत्यू!

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
पुणे,
Pune leopard attack पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या पारगाव तर्फे आळे परिसरात एका धक्कादायक घटनेत ८ वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतक मुलाचे नाव रोहित काफरे असून तो शेतमजूर कुटुंबातील होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांत संतापाची लाट उठली आहे.
 

Pune leopard attack, Rohit Kafre death 
घटनेवेळी Pune leopard attack  रोहितच्या आई-वडील शेतात कांदा लागवडीच्या कामात व्यस्त होते. या वेळी रोहित शेताजवळ खेळत होता. अचानक ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. काही क्षणांतच बिबट्याने रोहितला फरफटत नेऊन ठार केले. घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी रोहितला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.गेल्या तीन महिन्यांत ही बिबट्याच्या हल्ल्यांमधील चौथी मृत्यूची घटना असल्याचे स्थानिक प्रशासनाने नोंदवले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना दाटलेली आहे. “अजून किती निष्पाप बळी जाणार?” असा सवाल संतप्त ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात आला आहे.घटनेनंतर वनविभाग आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी, पिंजरे लावण्यासाठी, गस्त वाढवण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
 
 
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे आगमन झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही चर्चा खऱ्या तर काही अफवा असल्याचे समोर आले आहे. खराडी परिसरातही बिबट्याचे दिसल्याचे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बिबट्या दिसल्यास लगेच त्यांना कळवा आणि घाबरून जाऊ नका, तसेच शेतकरी आणि रहिवाशांनी स्वतःची खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
जुन्नर तालुक्यातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामीण भागातील लोकांचे सुरक्षित जीवन धोक्यात आले असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांकडून पुन्हा एकदा जोरदार मागणी करण्यात आली आहे.