नवी दिल्ली,
rahul gandhi today airport लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान परदेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सोमवारी पहाटे ते दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनकडे निघाले. पहाटे सुमारे ३ वाजून २० मिनिटांनी बीए १४२ या विमानाने त्यांनी लंडनकडे उड्डाण केले. सूत्रांच्या माहितीनुसार, लंडनमधील मुक्कामानंतर राहुल गांधी जर्मनीलाही भेट देणार आहेत.

दरम्यान, संसदेचे हिवाळी अधिवेशन आता अंतिम टप्प्यात आले आहे. १ डिसेंबरपासून सुरू झालेले हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार असून एकूण १५ बैठका निश्चित करण्यात आल्या आहेत. सोमवारी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा सुरू होणार असून प्रलंबित विधेयके आणि महत्त्वाच्या कायद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंतचे हिवाळी अधिवेशन मोठ्या प्रमाणात गोंधळात गेले आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर तीव्र मतभेद पाहायला मिळाले. विशेषतः ‘वंदे मातरम’, विशेष सघन सुधारणा (एसआयआर), मतदार यादीतील बदल आणि निवडणूक सुधारणांवरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादंग झाले. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.