मुंबई,
State Election Commission press conference राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा आज, १५ डिसेंबर रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता असून राज्य निवडणूक आयोगाने यासाठी आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे होणाऱ्या या पत्रकार परिषदेत आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांना राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व असून या निवडणुकांना ‘मिनी विधानसभा’ असेही म्हटले जाते. या निवडणुकांच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख शहरे आणि ग्रामीण भागातील सत्तेचे गणित स्पष्ट होणार असून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही या निकालांना महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आजच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित निवडणूक कार्यक्रमात राज्यातील १५ प्रमुख महापालिकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, अकोला आणि अमरावती या महापालिकांचा समावेश आहे. या महापालिकांमधील वॉर्ड रचना आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेता, ही निवडणूक राज्याच्या राजकीय दिशेचा कौल ठरणार असल्याचे मानले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही बारकाईने लक्ष असून, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यास राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार हे निश्चित मानले जात आहे.