मुंबई,
Tejasvi Ghosalkar joins BJP माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीआधी मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रभाग क्रमांक एकच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांनी मशाल सोडून कमळ हाती घेतले.
तेजस्वी घोसाळकर या शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर हे उद्धव ठाकरे गटातील प्रमुख नेते आणि माजी नगरसेवक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये फेसबुक लाईव्हदरम्यान त्यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याने संपूर्ण राज्य हादरले होते. तेजस्वी घोसाळकर या दहिसर विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि घोसाळकर कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी दीर्घकाळ जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. मे २०२५ मध्ये स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी तो राजीनामा मागे घेतला होता. मात्र यंदा, ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांचा दबाव होता का, अशा चर्चा सुरू झाल्या असतानाच भाजपाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले. अमित साटम यांनी स्पष्ट केले की कोणत्याही दबावामुळे नव्हे, तर भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवून तेजस्वी घोसाळकर यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत देशात मोठा विकास झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुंबईत झालेल्या बदलांनी तेजस्वी घोसाळकर प्रभावित झाल्या आहेत. अमित साटम यांनी सीसीटीव्ही प्रकल्प, अटल सेतू, कोस्टल रोड, बीबीडी चाळीतील मराठी कुटुंबांसाठी घरे, मेट्रो प्रकल्प, तसेच मुंबईच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा उल्लेख केला. मुंबईचा विकास, सुरक्षितता आणि हिंदुत्वाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवूनच तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात मुंबईचा सर्वांगीण विकास आणि शहराची सुरक्षितता यासाठी भाजपाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार त्यांनी केल्याचेही साटम यांनी सांगितले.