वॉशिंग्टन,
Temporary visa cancellation अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. H-1B आणि H-4 व्हिसासंदर्भात लागू होत असलेल्या नव्या नियमांमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. आजपासून अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना नव्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले असून, याच पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या व्हिसा मुलाखतीही काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अमेरिकेत राहणाऱ्या अनेक H-1B आणि H-4 व्हिसाधारकांना दूतावासाकडून एक ईमेल प्राप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ईमेलमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरते कामाचे व्हिसा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हा मेल पाहताच अनेक भारतीयांची झोप उडाली असून, अमेरिकेतील कंपन्यांमध्येही चिंता पसरली आहे. कारण अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्या भारतासह इतर देशांतील कुशल कर्मचाऱ्यांना याच व्हिसावर अमेरिकेत कामासाठी बोलावतात. अचानक मोठ्या प्रमाणावर व्हिसा रद्द झाले, तर त्याचा थेट परिणाम कंपन्यांच्या कामकाजावर होऊ शकतो.
मात्र, इमिग्रेशन वकील एमिली न्यूमन यांच्या मते, ही प्रक्रिया कायमस्वरूपी व्हिसा रद्द करण्याशी संबंधित नाही. त्यांनी स्पष्ट केले की, तात्पुरते व्हिसा रद्द करणे ही फक्त खबरदारीची उपाययोजना असून, त्यामुळे संबंधित व्यक्तींच्या कायदेशीर दर्जावर कोणताही परिणाम होणार नाही. पुढील व्हिसा भेटीच्या वेळी प्रत्येक प्रकरणाचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तरीही, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील व्हिसा नियमांमध्ये सातत्याने बदल होत असल्याने भारतीयांसाठी परिस्थिती अधिक कठीण होत चालली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे H-1B व्हिसाधारकांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेही सोशल मीडियावर व्हिसा तपासणी ही सतत सुरू असणारी प्रक्रिया असल्याचे नमूद केले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेतील संबंधही काहीसे तणावपूर्ण बनले असून, त्याचा फटका अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना बसत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात व्हिसा धोरणांबाबत नेमके काय निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.