हिंदुत्व म्हणजे भौगोलिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादाची ओळख : विवेक बीडवई

    दिनांक :15-Dec-2025
Total Views |
अहेरी,
Vivek Bidwai हिंदुत्व म्हणजे फक्त धर्म नसून भारतीयांची भौगोलिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी ओळख आहे. जिथे ’हिंदू’ म्हणजे सिंधू नदीच्या पलीकडील संस्कृतीचे आणि भूमीचे वंशज होय. त्याचप्रमाणे भारताची राष्ट्रीय ओळख ही हिंदू संस्कृती आणि मूल्यांवर आधारित आहे. समान भूमी, समान पूर्वज, समान श्रध्दास्थान, समान संस्कृती ह्याला मानणारा समाज म्हणजे हिंदू होय. देशात राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदू आहे. आपले पूर्वज कोण होते याचा प्रत्येकांनी शोध घेतला तर तो हिंदुत्वापर्यंत पोहोचतो. एकात्मतेचा विचार म्हणजेच हिंदुत्व आहे. संपूर्ण समाजाने एक होऊन भारताला बलशाली करून जगाचे नेतृत्व करण्यासाठी प्रयत्नरत राहावे, असे प्रतिपादन प्रांत गौ-सेवा गतीविधी प्रमुख विवेक बीडवई यांनी केले.
 

Vivek Bidwai  
संघशताब्दी वर्षांनिमित्त समाजातील प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधावा, या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरी तर्फे चिंचगुंडी येथील रोल प्रकल्पाच्या सभागृहात शनिवारी प्रमुख जनसंगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा संघचालक सुरेश गड्डमवार, प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारक गणेश शेटे, प्रांत व्यवस्था प्रमुख मोहन अग्निहोत्री, भारतीय विचार मंचचे जिल्हा संयोजक मिलिंद खोंड यांची उपस्थिती होती.
 
 
दीपप्रज्वलन व Vivek Bidwai भारतमातेच्या प्रतिमेला हार घालून वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गणेश शेटे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात पर्यावरण, स्वदेशी, सामाजिक समरसता, नागरिक शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, हे पाच बिंदू संपूर्ण समाजात रुजविण्यासाठी सज्जनशक्तीला सोबत घेऊन समाजात जागरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. स्वतःच्या संस्कृती आणि मूल्यांची जाणीव निर्माण करणे, ज्यातून राष्ट्राभिमान वाढेल, जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडणे आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी समजून घेणे, पर्यावरण संरक्षणासाठी सजग राहणे, ऊर्जा बचत करणे आणि निसर्गाशी सुसंवाद साधणे, समाजात एकता आणि सलोखा निर्माण करणे, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक बंध दृढ करणे, कुटुंबाला एकत्र आणणे, एकत्रित भोजन करणे, धार्मिक स्थळांना भेट देणे आणि मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणे आदी मूल्यांची जपणूक करण्याची आजच्या समाजाला नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले.
 
 
कार्यक्रमाला व्यापारी, शिक्षण, प्रशासकीय अधिकारी, कला, प्राध्यापक, उद्योजक, संत, पत्रकार, सीए, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विविध पंथाचे नागरिक, मठ-मंदिरे, विविध क्षेत्रातील नामवंत महिला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.