मुंबई,
Voting for municipal corporations in Maharashtra राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, मतदान 15 जानेवारी रोजी होईल आणि निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार आहे. या निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महापालिकांमध्ये एकूण 3.48 कोटी मतदार मतदान करतील. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या पाच ते सात वर्षांपासून राज्यातील 29 महापालिका निवडणुकीपासून वंचित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. याआधी 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता उर्वरित 29 महापालिकांसाठी मतदानाचे वेळापत्रक निश्चित झाले आहे.
27 महापालिकांची मुदत संपली आहे, तर जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांमध्येही निवडणूक होणार आहे. या महापालिकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी मान्य करण्यात आली आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्यामुळे त्यात नावे वगळण्याचा अधिकार राज्य आयोगाला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईमध्ये मतदार केंद्रांची संख्या 10,111 असून, एकूण मतदार केंद्र 39,147 आहेत. कंट्रोल युनिट 11,349 आणि बॅलेट युनिट 22,000 उपलब्ध राहणार आहेत. मुंबई महापालिकेतील एका सदस्यीय वॉर्डमुळे मतदारांना एकच मत द्यावे लागणार आहे, तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतांनुसार मतदान करावे लागणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. सध्या जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी ते निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत सादर करावे लागेल. निवडणूक होणाऱ्या महापालिका आणि वॉर्डांची संख्या बृहन्मुंबई 227, भिवंडी-निजामपूर 90, नागपूर 151, पुणे 162, ठाणे 131, अहमदनगर 68, नाशिक 122, पिंपरी-चिंचवड 128, औरंगाबाद 113, वसई-विरार 115, कल्याण-डोंबिवली 122, नवी मुंबई 111, अकोला 80, अमरावती 87, लातूर 70, नांदेड-वाघाळा 81, मीरा-भाईंदर 96, उल्हासनगर 78, चंद्रपूर 66, धुळे 74, जळगाव 75, मालेगाव 84, कोल्हापूर 92, सांगली-मिरज-कुपवाड 78, सोलापूर 113, इचलकरंजी 76, जालना 65, पनवेल 78 आणि परभणी 65 अशी आहे.