मोबाईलवर बोलणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा

679 वाहनचालकांवर 7.35 लाखाचा दंड

    दिनांक :16-Dec-2025
Total Views |
रवींद्र तुरकर
गोंदिया,
mobile phones तरुणाई मोबाईलमध्ये इतकी गुंग झाली आहे की, रस्त्यावर दुचाकी चालवतानाही मोबाईल कानाला लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वेग, वाहतूक नियम आणि स्वतःसह दुसर्‍याचा जीव याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून मोबाईलवर बोलणे, व्हिडीओ कॉल करणे किंवा मेसेज पाहणे ही धोकादायक सवय अपघातांना आमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतुक पोलिसांनी कठोर भूमिका घेत दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणार्‍यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. चालू वर्षात दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणार्‍या 679 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर 7 लाख 35 हजाराचा दंड ठोठावला आहे.
 

दुचाकी  
 
 
दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे हे अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञ वारंवार सांगतात. मोबाईलवर संभाषण करताना चालकाचे लक्ष रस्त्यावरून हटते. वाहनाचा वेग, आजूबाजूची वाहतूक, सिग्नल, पादचारी किंवा अचानक समोर येणारे अवजड वाहन यांचा अंदाज राहत नाही. अचानक ब्रेक लावण्याची वेळ आली किंवा परिस्थिती बदलली, तर वेळेवर प्रतिक्रिया देता येत नाही. यामुळे किरकोळ अपघातांसह गंभीर जखमा, अपंगत्व आणि मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. असे अनेक दुचाकीचालक मोबाईलवर बोलताना दिसतात. शहरासह जिल्ह्यात वाहतुक नियंत्रणासाठी मोहिमा राबविण्यात येत आहेत. यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे 679 चालक मिळून आले. या सर्व दुचाकीचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.mobile phones त्यानुसार, 7 लाख 35 हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. पैकी 81 वाहनचालकांनी 81 हजार रुपयाचा दंड भरला असून 598 चालकांकडे 6 लाख 54 हजार रुपयाची दंड रक्कम शिल्लक आहे.
हेल्मेटच्या आत मोबाईल
अनेक दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असले, तरी हेल्मेटच्या आत मोबाईल ठेवून संभाषण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. हेल्मेट हे अपघातानंतर संरक्षण देते; मात्र अपघातच टाळण्यासाठी वाहन चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावर असणे अत्यावश्यक आहे. मोबाईलवर बोलताना वाहनावरील नियंत्रण सुटल्यास हेल्मेट असूनही गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गप्पा ठरताहेत जीवघेण्या
दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणार्‍यांमध्ये तरुण-तरुणी, विशेषतः प्रेमी युगुलांची संख्या तुलनेने अधिक असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. कॉलेज, नोकरी किंवा फिरण्यासाठी निघालेले तरुण दुचाकी चालवत असतानाच दीर्घकाळ मोबाईलवर संवाद साधताना दिसतात. काहीजण तर दुचाकी चालवतानाच व्हिडीओ कॉल किंवा सोशल मीडियावर संभाषण करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. हा निष्काळजीपणा केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता इतर वाहनचालक, पादचारी आणि प्रवाशांच्या जीवावरही बेतणारा ठरत आहे.
जनजागृतीची गरज
दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे रोखण्यासाठी केवळ पोलिस कारवाई पुरेशी नसून, समाजानेही याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. पालकांनी त्यांच्या पाल्यांना वाहन चालवताना मोबाईल वापरू नये, याबाबत ठाम सूचना देणे, महाविद्यालये व सेवाभावी संस्थांनी वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. तसेच, मित्रमंडळी आणि प्रेमी युगुलांनीही सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
 
दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. काही सेकंदांचे दुर्लक्षही जीवघेणे ठरू शकते. विशेषतः तरुणांनी याची गंभीर दखल घ्यावी. नियम मोडणार्‍यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल. केवळ दंडच नाही, तर वारंवार नियम मोडणार्‍यांवर परवाना निलंबनासारखी कारवाईही करण्यात येणार आहे.
-नागेश भास्कर
पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतुक शाखा गोंदिया.