मुंबई,
Bike taxi service राज्यातील बाइक टॅक्सी सेवांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांत रॅपिडो, ओला, उबरसारख्या कंपन्यांच्या बाइक टॅक्सी सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला, परंतु अलीकडील अपघाती घटना आणि गुन्हेगारी घडामोडींमुळे आता या सेवा तात्पुरती बंद होऊ शकतात. सरकार पुढील २४ तासांत यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रातील परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवावी की नाही तसेच रॅपिडो, ओला, उबरसारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांना दिलेली तात्पुरती परवाने रद्द करावी की नाही या मुद्यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आढावा घेत पुढील कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सध्या अनेक खासगी कंपन्या बेकायदेशीररीत्या बाइक टॅक्सी सेवा सुरू करत आहेत. त्यामुळे अपघातांमध्ये मृत्यू किंवा गंभीर दुखापतींची संख्या वाढत आहे. त्यातच कल्याणमध्ये एका बाइक टॅक्सी चालकाने तरुणीच्या विनयभंगाचा प्रयत्न केला, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बाइक टॅक्सी सेवा अधिकृत परवानगीशिवाय चालू आहेत. मुंबई महानगर प्रदेशात विशेषत: अनेक अनधिकृत बाइक टॅक्सी रस्त्यावर धावत आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींवर मनाई असूनही प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अपघाती मृत्यू, गंभीर दुखापती आणि गुन्हेगारी घटनांमुळे प्रवाशांसाठी बाइक टॅक्सीने प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता, कायद्याची अंमलबजावणी आणि नियमांचे पालन यावर कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरत आहे.